राजहंस आणि डोमकावळा

एका डोमकावळ्याच्या मनात असे आले की, आपला रंग राजहंसासारखा पांढरा शुभ्र असावा. राजहंस आपले अंग पाण्याने वरचेवर धुतो व सदासर्वदा पाण्यातच राहतो, तसेच आपणही केले असता आपला रंग पांढरा होईल, असे त्यास वाटले. मग त्याने आपली पूर्वीची राहणी सोडून दिली व नदया आणि तळी यांच्यातून तो राहू लागला. पण पाण्यात राहिल्याने त्याचा रंग बदलला नाहीच, पण लवकरच थंडी होऊन त्याला आपल्या प्राणास मुकावे लागले.

तात्पर्य:- नैसर्गिक गोष्टीत बदल करण्याचा प्रयत्न कधी सिध्दीस जाणार नाही.