राज्यभरात जळजळीत काम बंद आंदोलन

राज्यभरात जळजळीत काम बंद आंदोलन

राज्यभरात जळजळीत काम बंद आंदोलन

मनमाडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी जिवंत जाळल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात राज्य कर्मचारी संघटनेच्या अठरा लाख कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुक मोर्चे, निदर्शने आणि शोक सभा यांच्या माध्यमातून राज्यभर सरकारी कर्मचा-यांनी जळीतकांडाचा निषेध केला आहे.

सोनावणे यांच्या निर्घूण हत्येचा निषेध करण्यासाठी राजपत्रित अधिका-यांच्या महासंघाने आज (गुरुवारी) काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रतिसाद देत राज्यभरातील सर्व महसुली विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी सकाळपासूनच कार्यालयाबाहेर हत्येचा निषेध करत आंदोलन सुरू केले आहे. सरकारी कामाकरिता गेलेल्या सनदी अधिका-यास पुरेसे संरक्षण दिले जात नसल्याचा गंभीर आरोप कर्मचा-यांनी केला आहे.

एकीकडे हे आंदोलन सुरू असताना दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी एक उच्चस्तरिय बैठक घेऊन तेलातली भेसळ रोखण्यासाठी ठोस उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. जळीतकांडानंतर जाग्या झालेल्या महाराष्ट्र सरकारने देखिल भेसळखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. राज्यभारातील सुमारे २०० ठिकाणी छापे टाकून २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल १८० भेसळखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर भेसळीची साधने जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, शिवसेनेने मनमाड बंद आंदोलन पुकारले आहे. नाशिकमध्येही बंद पुकारण्यात आला आहे. दोन्हीकडे बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. सरकारी कामकाज तसेच औद्योगिक क्षेत्राचे व्यवहार सकाळपासूनच बंद आहेत.