पेट्रोलवरचा व्हॅट कमी करणार

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

राज्यभरामध्ये पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याच्या प्रस्तावावर राज्यशासन विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिली. पेट्रोल दरवाढीविरोधात राज्यभरात संतप्त झालेल्या नागरीकांच्या विविध प्रतिक्रियांनंतर त्यांनी ही माहिती दिली. पुण्यात एक कार्यक्रम आटपून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यशासन पेट्रोल दरवाढीवर लवकरच तोडगा काढेल, असे आशावादी मत देखिल त्यांनी व्यक्त केले. राज्यामध्ये दुष्काळ निवारण करण्यासाठी शासनाच्या सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी ते म्हणाले, ‘कोणत्याही प्रकारचा देखावा शासन करत नाहीये. दुष्काळ निवारण करण्यासाठी शासन आर्थिक मदत करत आहे पण टाळाटाळ करण्याचा कोणताच प्रश्न इथे उभा राहत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट पैशामुळे अडून राहत आहे, असेही नाही.

७६ हजार कोटींचे प्रकल्प राज्यात प्रलंबित आहेत. राज्याचे बजेट त्या तुलनेने कमी आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पुरवठा करण्याचे काम हे प्राधान्यक्रमावर असून इतर प्रकल्पांचे काम हळूहळू केले जात आहे.’ अनेक प्रश्नांमुळे श्वेतपत्रिका काढण्याचा प्रस्ताव मागे पडला आहे. त्या अडचणींवर तोडगा काढत ह्या कामाला मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.