सर्वोच्च प्राधान्य क्रिकेटलाच

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

 

राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेऊन विश्व्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने नव्या ‘इनिंग’ची सुरुवात केली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘यूपीए’ सरकारने गेल्या २६ एप्रिलला राष्ट्रपतिनियुक्त सदस्य म्हणून सचिनच्या रुपाने एका क्रिकेटपटूला खासदारकीचा सन्मान बहाल केला. सचिनला राष्ट्रपतिनियुक्त खासदारांना असणारे सर्व मर्यादित अधिकार असतील पण राष्ट्रपती निवडणूकीत त्याला मतदान करता येणार नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. त्यामुळे राष्ट्रपतिनियुक्त खासदारांना उपराष्ट्रपतिच्या निवडणूकीत मतदान करता येते. सरकारला राज्यासभेवर असे १३ खासदार नियुक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.

सचिन आणि त्याची पत्नी अंजली सकाळी अकरा वाजता संसदेत पोचले. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्या दलनात सचिनला वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांच्या गराड्यातून नेण्यात आले. अन्सारी यांनी सचिनचे स्वागत केले. संसदीय कामकाजमंत्री हरीश रावत, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी व राज्यमंत्री राजीव शुक्ला आदी उपस्थित होते.
शपथ ग्रहण करताना सचिनने राष्ट्रभाषा हिंदीलाच प्राधान्य दिले.

“यापुढील काळातही माझे सर्वोच्च प्राधान्य क्रिकेटलाच असेल. मी जो काही आहे तो क्रिकेटमुळेच आहे. आता क्रिकेटला काही द्यायची माझी वेळ आली आहे,” असे सचिनने पत्रकारांना सांगितले. सचिनने ‘माहिती नाही’ असे क्रिकेटमधील निवृत्तीबाबतच्या प्रश्नांना उत्तर दिले.

संसद अधिवेशन सध्या सुरु नसल्याने, सचिनला राज्यसभा अध्यक्षांच्या दालनात संसदीय संकेतांनुसार शपथ देण्यात आली. सध्याच्या संसदेतील चौथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून सचिन ठरला आहे. मोहम्मद अजहरुद्दीन, नवज्योतसिंह सिद्धू आणि कीर्ती आझाद हे सचिनच्या आधी संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहे.

साशंकता अशी आहे की, सचिन जरी खसदार झाला असला तरी संसदेत त्याला किती वेळ देता येईल, हे सांगता येत नाही.