खासदार सचिनने नाकारला सरकारी बंगला

खासदार सचिन तेंडुलकर

खासदार सचिन तेंडुलकर

राज्यसभेचा सदस्य या नात्याने खासदार सचिन तेंडुलकर याला सरकारचा भव्य बंगला मिळणार होता, पण त्याला सचिनने नम्रपणे नाकरले आहे. ‘सरकारी बंगला स्वीकारून मला करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करायची नाही,’ असे स्पष्ट मत सचिनने दिले आहे.

गेल्या सोमवारी सचिनने राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आणि त्यानंतर सगळ्याच माध्यमांतून या बंगल्याची चर्चा झळकत होती. या बंगल्याच्या किती खोल्या असतील, इथपासून ते, सचिन राहुल गांधींचा शेजारी होणार का, इथपर्यंत चर्चा रंगत होती. पण काल सचिनने आपले मत स्पष्ट करून या विषयाला कुलूप लावले आहे. एका मुलाखतीत सचिनने सांगितले की, ‘मी थोड्या काळासाठीच दिल्लीत असेन. त्यासाठी मला कोणत्याही सरकारी बंगल्यात रहायवी उत्सुकता नाही. मी जर हा बंगला स्वीकारला तर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होईल. माझ्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला हा बंगला दिलात तर ते अधिक चांगले होईल.’

दिल्लीत असल्यावर तो हॉटेलमध्ये राहील, हे ही त्याने स्पष्ट केले. ‘राज्यसभेचा खासदार होण्याचा सन्मान मिळणे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या पदाकडून मिळणार्‍या कुठल्याही सुविधांची मला अपेक्षा नाही. पण हा बंगला नाकारल्याने एक खासदार म्हणून माझ्या जबाबदार्‍यांवर कसलाही दुष्परिणाम होणार नाही. मी आशा करतो की प्रत्येक सत्रात मी संसदेत काही दिवस तरी उपस्थित राहीन,’ असे सचिनने सांगितले.

एक क्रिकेटपटू म्हणून सचिनने आपली भूमिका चांगलीच बजावली आहे पण आता एक खासदार म्हणून तो या जबाबदारीला कितपत न्याय देऊ शकेल, असा प्रश्न कित्येकांना पडत आहे. नव्या क्षेत्रात पदार्पण करुनही देशातल्या नागरिकांशी असलेले नाते अतूट आहे, असे आपल्या पहिल्याच निर्णयातून संदेश देऊन सचिनने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.