संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी पुणे

रविवारी (१० जून) आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपात सुरुवात होणार आहे.

‘रविवारी आषाढी वारीला प्रस्थान होईल. देऊळवाड्यातील शिळा मंदिरात रविवारी पहाटे साडेचार वाजता महापूजा होईल. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी साडेपाच वाजता महापूजा होईल. त्यानंतर संत तुकाराम महाराज मंदिर जे वैकुंठस्थानी आहे, तेथे महापूजा होईल. संस्थानाच्या विश्वस्तानाच्या वतीने सकाळी सात वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा होईल. देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन सकाळी नऊ वाजता होईल. देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी सोहळा कार्यक्रमाला दुपारी अडीच वाजता सुरुवात होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संस्थानातर्फे निमंत्रण देण्यात आले आहे. पण प्रशासनाकडून अजून तरी त्यांच्या उपस्थितीबाबत समजलेले नाही. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

संस्थानाच्या वतीने पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, मानकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुख्य देऊळवाड्यातून पालखी सोहळ्याचे इनामदार वाड्याकडे सायंकाळी पाच वाजता प्रस्थान होईल. सोहळा या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.