सलगमचा कुर्मा

साहित्य :

 • ३०० ग्रॅम सलगम
 • २ मोठे कांदे
 • ३ चमचे खसखस
 • ५-६ लसूणपाकळ्या
 • १ इंच आले
 • ७-८ काळी मिरी
 • अर्धा चमचा जिरे
 • २ चमचे धने
 • २ तमालपत्र
 • १ चमचा मीठ
 • १ वाटी दही
 • अर्धा वाटी तूप किंवा तेल
 • अर्धी वाटी साय

कृती :

सलगमचा कुर्मा

सलगमचा कुर्मा

सलगम धुवून साले काढावी व त्याचे मध्यम तुकडे चिरावे. कढईत तीन चमचे तेल घालून त्यात हे तुकडे मंद परतावे. गुलाबीसर रंग आला की ताटलीत काढून घ्यावे व पाट्यावर जाडसर वाटावे.

आले-लसूण, खसखस, जिरे, मिरे, धने व कांदे थोडे पाणी घालून एकत्र बारीकवाटावे. कढईत तेल घालून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालावा व वास सुटेपर्यंत चांगला परतावा. त्यात सलगम व मीठ घालून अलगद ढवळावे. एक वाफ आली की दही घुसळून त्यात घालावे व दोन मिनिटे शिजू द्यावे. कुर्मा दाट वाटल्यास थोडे गरम पाणी अगोदर घालावे. उकळी आली की खाली उतरवावे.

वाढण्यापूर्वी घोटलेली साय वर घालावी व नंतर पानात किंवा वाटीत कुर्मा वाढावा.