संकल्प सुरक्षित भारताचा

संकल्प सुरक्षित भारताचा

संकल्प सुरक्षित भारताचा

आजही मला बंगळूर मधले माझ्या मैत्रिणींसोबतचे कॉलेजचे मंतरलेले दिवस आठवतात. कॅंटिग मधल्या चहाची टेस्ट आजही माझ्या जिभेवर रेंगाळतेय. तस आमच्या तरुणपणी आम्हा मैत्रिणीचं न्यू ईअर प्लानिंग वगैरे नसायचं. पण हो टी.व्ही. वरचे नववर्ष विशेष कार्यक्रम आम्हा सर्वांना मनोरंजनाची पर्वणीच बनायचे आणि सोबत फॅमिली डिनर आहेच कि! जेवणात रोजचेच मेनू जरी असले तरी आईच्या हातची भजी मात्र नाविन्य आणायची. वास्तविक पाहता त्यावेळेस मुलांचे ग्रुप मस्त पैकी एकत्र येउन धमाल करायचे. तशी उशिरा पर्यंत घराबाहेर राहण्याची परवानगी मुलींना नव्हती. कदाचित आमच्या पुरोगामी देशात तशी तरतूद नसावी. बाईच्या अस्तित्वाला नेहमीच नात्यांचा, नीतीनियमांचा, परंपरेचा पारा लावलेला त्यामुळे प्रकाशकिरण आरपार जातच नाही, तो असतो फक्त धुकं पसरलेला आरसा. ही परिस्थिती मनात घर करून बसायची आणि नंतर मला असही वाटलं कि आम्ही नशीबवान नाही म्हणून. पण आज वर्तमान पाहता आमची युवा पिढी ज्या प्रकारे पाशात्य संस्कृती समवेत फॅशन आणि लाइफ स्टाईल च्या नावाखाली खूप काही वाईट गोष्टी करतेय त्यावरून स्वच्छ भावनेनं मला असंही वाटतंय कि आम्हीच नशीबवान होतो.

वर्तमानांत आम्ही येवढं मोठं राष्ट्र होऊन बसलोय कि आमच्या कर्तुत्वाने क्षितिजावर आरुड झालेले आम्ही जगाला सर्वोत्तमतेची साद घालतोय. इसवी सन २०२० पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनोर्‍यात बसून चितारलेले मिथ्या स्वप्न नव्हे किंवा केवळ आशावादही नव्हे. खरे तर, ही अथक परिश्रमांची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे अशा धाटणीची स्वप्न पाहताना दिल्ली सारख्या शहरातून ऐकू येणाऱ्या भयानक बातम्या मन सुन्न करतात. अशा हजारो पिडित स्त्रिया लाखो अनुत्तरीत प्रश्न घेऊन फिरतात. पुरुशांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या मुली ह्या देशात सुरक्षित आहेत का ? ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी’, मग समाज्याच्या उद्धार करणाऱ्या आमच्या स्त्री च्या वाट्याला येतंय तरी काय ? सावित्री बाईंचा वसा सांगणारा आमचा समाज स्त्रियांना फक्त रांधा वाढा आणि उष्टी खरकटी काढा ह्याच गोष्टीची अपेक्षा करतो हे सत्य नाकारून चालणार नाही.

वर्तमान पाहता कविता महाजनांच्या ओळी आपल्याश्या वाटतात..

‘आमचं क्षितीज देखील विरून विरून झिरमिरीत झालय, जर उगवाव म्हटलच चंद्रकोरीनं तर तिचा अणुकुचीदार स्पर्श होताच फरकन टरकावलं जाईल आणि गळून पडेल पायाशी जुनाट गालीचा बोळा होऊन’.

आज आमच्या हजारो स्त्रिया जुनाट गालीच्याचा बोळा होऊन बसल्यात.

मग अश्या परिस्थितीत आमचे तरुण मेणबत्ती पेटवण्याशिवाय काही करू शकत नाहीत याचंच दुःख होतं. स्त्रिया स्वतःच स्वतःच्या स्वबळावर कर्तुत्वाच्या उंच शिखरावर आरूड व्हायला तयार आहेत, त्यांना नकोय मदतीचा हात, नकोय सहानुभूती फक्त हवाय एक विश्वास समाजातल्या श्वापदांपासून सुरक्षिततेचा. मला आजच्या तरुण पिढी कडून खूप मोठी अपेक्षा आहे. ‘चला तर मग ठेवा पाउल आपल्या ध्येय पूर्तीच्या दिशेने, सरसाउदेत आमचे बाहू अन्यायाच्या चिडीने, संकल्प करूया नव वर्षाचा आपण सारे असेल सहभाग आमचा सुरक्षित भारताच्या दिशेने’.

1 thought on “संकल्प सुरक्षित भारताचा

Comments are closed.