सरदार आणि त्याचा घोडा

एक सरदार लढाईच्या वेळी आपल्या घोडयाच्या खाण्यापिण्यासंबंधाने फार काळजी घेत असे. पुढे काही दिवसांनी लढाई संपली आणि त्या सरदाराचा पगार कमी करण्यात आला, यामुळे तो आपल्या घोडयास अगदी निष्काळजीपणाने वागवू लागला. ज्या घोडयाने पूर्वी त्याला भर लढाईच्या जागी मोठया शौर्याने आपल्या पाठीवर वाहिले होते, त्याच घोडयास तो आता मोठमोठी लाकडे वाहून नेण्याच्या कामास लावू लागला. शिवाय त्याच्या खाण्यापिण्यास काळजीही तो घेईनासा झाला. यामुळे तो घोडा दिवसेंदिवस अगदी रोड व अशक्त होत चालला.

पुढे एके दिवशी, पुनः लढाई सुरू झाल्याची बातमी येऊन, त्या सरदारास लढाईवर जाण्याचा हुकूम आला. सरदार आपल्या घोडयाची आता विशेष काळजी घेऊ लागला. तो चांगला सशक्त व्हावा म्हणून त्याने त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम ठेवली, परंतु घोडयाची प्रकृती काही चांगली सुधारली नाही. सरदार घोडयावर बसून लढाईवर चालला असता घोडयास त्याचे ओझे उचलण्याची ताकद नसल्यामुळे तो वरचेवर अडखळू लागला. मग तो घोडा सरदारास म्हणतो, ‘तू आपल्या निष्काळजीपणाने ही स्थिती प्राप्त करून घेतलीस ! माझ्या पाठीवर लाकडे लादून आणि माझे अन्न तोडून तू मला घोडयाचा गाढव बनविलास ! अशा स्थितीत लढाईच्या कामी मी जर पूर्वीप्रमाणे तुझ्या उपयोगी पडेनासा झालो. तर त्यात मजकडे काय दोष आहे बरे!’

तात्पर्य : एकादया प्राण्याची जरुरी नसली म्हणजे त्याला पायाखाली तुडवावयाचे आणि जरुरीच्या वेळी मात्र त्याच्यासंबंधाने फार काळजी घ्यावयाची ही वर्तनाची पध्दत हितकर नाही.