ससा आणि चिमणी

एक गरुड पक्षी एका सशाच्या बोकांडीस बसला होता. तेथे जवळच झाडावर एक चिमणी बसली होती, ती त्या सशास म्हणते, ‘अरे, तू किती मूर्ख आहेस ! असा भित्रेपणा धरून तू आपला जीव फुकट घालवतोस? ऊठ आणि चालता हो. तू जर यत्न करशील तर आपल्या चपळपणामुळे या गरुडाच्या हातून सहज सुटशील.’ याप्रमाणे ती चिमणी भाषण करीत आहे, तोच एका ससाण्याने झडप घालून तिला पकडले. त्यावेळी ती फार विलाप करू लागली. मरणाच्या दारी बसलेला ससा तिला म्हणतो, ‘अगे, तू स्वतःस निर्भय मानून मला हिणवीत होतीस, पण आता तोच प्रसंग तुजवर आला आहे. यावेळी तू आपला जीव कसा काय वाचवितेस पाहू बरे.’

तात्पर्य:- स्वतःवर संकट आले नाही, तोपर्यंत लोक दुसऱ्यास शास्त्रार्थाच्या आणि धीराच्या गोष्टी सांगतात; पण शेवटी स्वतःवर संकट आले म्हणजे त्यांची जी धांदल उडते, ती काही विचारू नये.