ससा आणि कुत्रा

एकदा एक कुत्रा एका सशाच्या मागे लागला. त्या कुत्र्यास भूक लागली नव्हती, यामुळे त्याने तो ससा हाती लागला असताही त्यास एकदम मारून खाल्ले नाही. एखादे वेळी त्यास चावावे व एखादे वेळी त्याचे अंग चाटावे, असा क्रम त्याने चालविला. ते पाहून ससा त्यास म्हणतो, ‘अरे, तू माझा शत्रू आहेस की मित्र आहेस ? जर तू माझा मित्र आहेस, तर तू मला असा चावतोस का ? व जर शत्रू आहेस, तर मला चाटतोस का ?’

तात्पर्य : जो आपला मित्र आहे की शत्रू आहे, हे कळत नाही, त्याच्याशी कोणत्या प्रकारे वागावे, हे समजणे कठीण आहे.