सातारा जिल्हा

चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव बहामनी व तद्नंतर आदिलशाही या राजवटी येथे नांदल्या. चालुक्य काळातील इ. स. ७५४ मधील सामानगडच्या ताम्रपटात सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. भारहूत (जबलपूर) व कुडा (अलिबाग) येथील स्तूपांवर करहाट (कऱ्हाड) चा उल्लेख केलेला आहे.

मराठ्यांच्या इतिहासाशी तर, साताऱ्याचे नाते अतूट आहे. शिवशाहीत हा प्रदेश स्वराज्यात अंतर्भूत होता, हा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातच छत्रपती राजारामाने आपली गादी येथे स्थापन केली होती. इ.स. १७०० मध्ये राजाराम मरण पावल्यावर आपला मुलगा दुसरा शिवाजी यास राज्याभिषेत करवून ताराबाईने येथूनच राज्यकारभार पाहाण्यास सुरुवात केली. छत्रपती शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर झालेल्या संघर्षात शाहूचा पक्ष वरचढ ठरला. सातारची गादी शाहू महाराजांच्या ताब्यात आली. १७०८ मध्ये येथे शाहूंचा राज्याभिषेक संपन्न झाला. ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन केली. तेव्हापासून छत्रपतींची ‘थोरली पाती’ सातारा येथे प्रस्थापित झाली.

कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्रई या पंचगंगाप्रमाणेच रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उद्‍गमही याच जिल्ह्यात झाला ! कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इ. स. १९१९ मध्ये काले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. १९२४ मध्ये या शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचे रूपांतर आज संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या वटवृक्षात झाले आहे.