आनंदाचं झाड

सावली प्रतिष्ठान

सावली प्रतिष्ठान

पुण्यातल्या कोथरुड भागातील सावली ही मतिमंद आणि बहुविकालांगांसाठी काम करणारी संस्था (Savali Institutional Care and Rehabilitation Center, Kothrud). या संस्थेचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. गेल्या २० वर्षांपासून सावली मतिमंद आणि बहुविकालांग मुलांच्या पंखात बळ भरण्यासाठी काम करत आहे. अपंगाना त्यांचे ह्क्क मिळावेत दया किंवा मेहरबानी नको या उद्देशाने वसंत ठकार यांनी २२ नोव्हेंबरला सावलीचं रोपटं लावलं. आज या रोपटाचं वटवृक्षात रुपातंर झालं आहे. अपंगांना योग्य सोयी, सुविधा मिळाव्यात त्यांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन व्हावे, बहुविकालांग आणि मतीमंदाविषयी असलेले गैरसमज दुर व्हावेत या उद्देशाने झपाटलेल्या श्री वंसत ठकार यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन या सामाजिक कार्यात उडी घेतली. मतीमंद मुलांच्या पालकांच्या दु:ख काय असते याची पुर्ण कल्पना असल्याने वंसत ठकार यांनी संस्था काढण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच मतिमंद मुलांच्या पालकांना त्यांच्यासाठी असलेले कायदे, सेवा, सुविधा याबद्द्ल जागॄती करुन देणे हा उद्देश ही होता.

आज तीव्र अपंगत्वा मुळे ज्या मुलांना इतर शाळेत नाकारलं जातं त्या मुलांना सावलीने आपल्या पंखा खाली घेऊन या मुलांना आणि पर्यायने त्यांच्या पालकांना आशेचा किरण दाखवला आहे. आपल्या नंतर आपल्या मतिमंद पाल्याचं काय हा अनेक पालकांची काळजी सावलीने दुर केली आहे. सावलीतल्या अपना घर मध्ये या मुलांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच विषेश शाळा, डे केअर, रिस्पाईट केअर, थेरिपी हे विभाग या मुलांच्या सर्वागीण विकासाठी प्रयत्न करत असतात. विशेष शाळेत या मुलांना अभ्यासाबरोबर कला, संगीत नृत्य हे वेगवेगळे विषय शिकवले जातात. त्याचबरोबर स्वयंपुर्ण होण्यासाठी मेणबत्या, नकली फुलांचे हार आणि फुले बनविणे, टायपिंग, टेलरिंग, यांसारखे व्यवसायभिमुख प्रशिक्षण ही दिले जाते. तुम्हाला, आम्हाला सहज न जमलेला विषय या शाळेतील मुलांनी सहज आत्मसात केला आहे. तो म्हणजे आनंदी राहणं. जे आहे ते स्वीकारुन नविन काहीतरी निर्माण करण्याची जिद्द, उमेद आणि त्याच बरोबर आत्मविश्वास सावली आज या मुलांमध्ये निर्माण करत आहे.

सावलीच्या विशेष शाळेत खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवलं जातं. या मुलांना शिकवताना कमालीचा संयम आवश्यक आहे. आज शिकवलेली गोष्ट अनेक दिवस शिकवावी लागते. प्रत्येकाचा बुध्यांक वेगवेगळा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिकवण्याचे मापदंड वेगवेगळे असतात. अशा वेळी शिकताना जितका या मुलांचा कस लागतो तितकाच किंबहुना त्याहुनही आधिक कस त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा लागतो. मतिमंद मुलांना त्याहुनही तीव्र अपंगत्व असलेल्या मुलांना शिकवणं ही अवघड कामगिरी सावलीचे शिक्षक लीलया पेलतात. एखादे काम मनासारखे न झाल्यास किंवा त्यांना अटकाव केल्यास हायपर अ‍ॅक्टीव मुले दंगा करतात, रडतात, बोचकारतात. अशावेळी या मुलांना विश्वासात घेऊन, त्यांच्या मनातील भिती दुर करुन त्यांना आपलेसं करण्याचं आव्हान या शिक्षकांसमोर असतं. ‘वाळुचे कण रगडिता तेल ही गळे’ ही उक्ती सावलीच्या शिक्षकांना चपखल बसते.

सावलीत प्रत्येक सण साजरे केले जातात. नाटक, नॄत्य, खेळ या स्पर्धांमध्ये ही मुलं भाग घेतात आणि पारितोषिकेही पटकावतात. या मुलांनी जिल्हा आणि राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. या मुलांची शैक्षिणक सहलही असते. या मुलांना आनंदी, उत्साही त्याबरोबरच कार्यक्षम ठेवण्यासाठी इथे विशष प्रयत्न घेतले जातात. त्यामुळेच आज घरापासून दूर राहुनही सावली हे आज त्यांचे दुसरे घरच बनले आहे. सुट्टीला गेलीली मुले परत सावलीत येण्यासाठी आतुर असतात यावरुन त्यांचे सावलीशी असलेले ऋणानूबंध दिसतात. सावली ने निर्माण केलेल्या विश्वासामूळे पहिल्यांदा आपल्या पाल्याला इथं ठेवायला बिचकाणारे पालक आता निर्धास्त झाले आहेत.

अपंग मुलांसाठी विशेष शाळा, वसतिगृह यांपुरती मर्यादित न राहाता सावलीने मतिमंद आणि अपंगाविषीयीचे जनजागॄतीचे उपक्रम गाव, खेडे पातळीवर यशस्वीपणे राबवले. महाराष्ट्र आणी केंद्र्शासन यांच्या अपंगाविषयी असलेल्या सोयी सुविधांविषयी बरचसे पालक अनभिज्ञ असतात. अशा पालकांसाठी, मुलांसाठी, शासकीय अधिकाऱ्यांसाठी सावलीने जनजागॄतीच्या माध्यमातून निरनिराळी माहिती पुरवली आहे. शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थी पर्यंत पोहचवण्यात सावली साहाय्य्भूत दुवा ठरली आहे. विषेश मुलांच्या पालक प्रतिनीधींचा आनंद मेळावा, संपुर्ण भारतातील पालक परिषद यांसारखे उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवला. आज ४५ मुले सावलीत राहत आहेत. त्यांचे आर्थिक, सामाजिक स्तर भिन्न असुनही, त्यांच्याकडून मिळाणाऱ्या मोबदल्याची अपेक्षा न करता ते आज सावलीच्याच्या छताखाली सामावलेले आहेत. या उपक्रमांबरोबर सावलीने आपला पसारा ही वाढवला. २००१ साली सावलीला न्यासातर्फे मान्यता मिळाली. यामूळे या मुलांचे, प्रौढांचे पालकत्व स्विकारुन त्यांची देखभाल करणे, त्यांना स्वयंपुर्ण बनण्यास प्रक्षिशण देणे हे पायाभूत काम करणे सावलीला शक्य झाले. प्रशिक्षण केंद्र म्हणुनही सावलीस मान्यता मिळाली. श्री वसंत ठकार यांनी आपल्या बंगल्यात लावलेल्या रॊपट्याचं स्वतंत्र इमारतीत रुपांतर झालं. संस्थेने २००७ साली मुळशी तालुक्यातल्या अमबंरवेट इथं दुसरा प्रकल्प सुरु केला. आज या इमारतीट १५ मुले आहेत.

सी. बी. आर प्रोजेक्ट, प्रशिक्षण केंद्र, पॅरेन्ट्स ऑरगनाईझेशन असे अनेक टप्पे पार करत सावली संस्था म्हणून नावारुपाला आली. संस्थेचा आवाखा वाढत असताना गुणवत्तेलाही प्राधान्य दिलं गेले. आज सावलीच्या एका युनिट मध्ये केवळ ३० ते ३५ मुले आहेत. त्यांच्या आरोग्याची, खाण्यापिण्याची यथायोग्य काळजी घेतली जाते. सावलीचे सर्वच विभाग अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहेत. सावलीन ने केवळ अपंगांना बरोबरच गरजू, परित्याक्त्ता यानांही आधार दिला.

आजवरचा सावलीचा प्रवास वैषिट्यपुर्ण असला तरी सावलीची वाट ही खडतर होती. परंतु रस्त्यात आलेल्या काट्यांना अलगद दुर करुन सावली धडपडत, अडखळत मार्गक्रमण करत राहिली. राज्य सरकार कडून मिळाणारं अनुदान नाकारून स्वावलंबनाचा नवा आदर्श संस्थेने निर्माण केला. मतिमंद, बहुविकालांग यांना स्वयंपुर्ण करण्यापुर्वी संस्थेने स्वावलंबी होणं गरजेच आहे, हे श्री वसंत ठकार यांनी जाणलं. खर तर शासकीय़ अनुदानामूळे सावलीची आर्थिक विवंचना संपली असती पण सरकारी धोरणांप्रमाणे लागणाऱ्या नोकर भरतीमूळे मुलांचे संगोपन अडचणीत आले असते. म्हणूनच आर्थिक चणचण सोसून मुलांच्या संगोपनला प्राधान्य दिले कारण फायद्या तॊट्याच्या गणितासाठी सावली कधीच नव्हती.

सावलीच्या या अजोड कष्टांची दखल आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. फाय फाऊन्डेशन पुरस्कार, न्यासो राष्ट्रीय पुरस्कार, नॅशनल ट्रस्ट अ‍ॅवार्ड अशा पाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह सह अनेक पुरस्कारांची सावली मानकरी ठरली आहे. अशा ध्येयवेड्या संस्थेला गरज आहे तुमच्या आमच्या मदतीची. आज सावलीमूळे या मुलांच्या डोळ्यात आंनद तर पालकांच्या डॊळ्यात समाधान दिसते आहे.

“कोण म्हणेल विकलांग
परि बोलके आमचे अंग अंग”
या ओळी सत्यात उतरवण्यासाठी सावली अखंड पणे झटत आहे.

सावली प्रतिष्ठान
[nggallery id=115]