शंकराचा बेल

केदार इंदूरकर

केदार इंदूरकर

देवाला आणि संकटाला कधीही पाठ दाखवू नये. कारण देवाची भक्ती आणि संकटातून मुक्ती सामोरे गेल्याशिवाय होत नाही. हल्ली आपल्या दु:खाचे प्रदर्शन भरवायला सर्वांनाच आवडते. सहानुभूती गोळा करण्याचा आजार सर्वत्र पसरला आहे. चांगले बूट नाहीत म्हणून रडणार्‍यांच्या जगात पाय नसून हसणारेदेखील आहेत. संकटाची पुडी बांधून खिशात ठेवणार्‍या केदार इंदूरकरचा जन्म १६ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. तो जन्मला तेव्हा त्याचे वजन फार कमी होते. वडील वसंत इंदूरकर हे चार्टर्ड अकाऊंटंट. केदारचा जन्म झाला तेव्हा ते आफ्रिकेत काम करत होते. आई छोट्या बाळाला घेऊन आफ्रिकेला गेली. तिथे चांगले वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. ‘सेरेब्रल पाल्सी’ नामक आजाराने तान्या केदारला पछाडले होते. हिंदुस्थानातच चांगले उपचार होतील म्हणून इंदूरकर कुटुंब देशात परतले. पण नशिबाने वेगळाच खेळ मांडला. केदार एक वर्षाचा झाला नाही तेवढ्यात त्याच्या आईचे हृदयविकाराने निधन झाले. फार लहान वयातच केदारने खूप काही गमावले. तो तीन वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी डॉ. सुहासिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. केदारला सांभाळण्याची जबाबदारी सुहासिनीताईंनी स्वीकारली तेव्हा त्यांना मूर्खात काढणार्‍यांची संख्या फार मोठी होती. देवकी गेली, पण सुहासिनीताईंच्या रूपाने केदारला यशोदा मिळाली. ते तिघे दिल्लीत राहात. दिल्ली स्पास्टिक स्कूलमध्ये आईने केदारचा दाखला केला. केदार बोलू शकत नव्हता, पण त्याला सर्व कळते याची जाणीव सुहासिनीताईंना होती. स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांना कळत होते की त्या शाळेत केदारची प्रगती न होता अधोगती होईल. इतर मुलांच्या तुलनेत तो तल्लख होता. चांगली फिजीओथेरपी बँगलोरमध्ये मिळते हा शोध घेऊन दोघे नवराबायको बँगलोरला रवाना झाले. कामधंद्याला टाळे मारून केदारसाठी दोघांनी बँगलोरमध्ये नव्याने संसार सुरू केला. तिथेच केदारच्या बहिणीचा, केतकीचा जन्म झाला. फिजीओथेरपीचा लाभ झालाच. नंतर ते सगळे परत दिल्लीत स्थायिक झाले. ‘आता याला शिकवायचे कसे?’ असा प्रश्‍न आई-वडिलांना पडला होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून केदारने उलटे शब्द बोलायला सुरू केले. दिल्लीतील लिटल एन्जल्स पब्लिक स्कूलमध्ये त्याने चौथीपर्यंत सामान्य मुलांसोबत शिक्षण घेतले. ओळखीतील दिल्लीत राहणार्‍या मराठी लोकांनी भरभरून मदत केली. सर्व काही चाललेच होते, पण दिल्लीचा वैताग आला होता केदारच्या आई-वडिलांना. ‘‘आपण पुण्यात आपल्या लोकांमध्ये राहू!’’ असा निर्णय दोघांनी घेतला. पण पुण्यातील शाळांनी केदारची साथ दिली नाही. त्याला शाळेतून काढण्यात आले. दहावीपर्यंतचा अभ्यास त्याने घरीच केला. दिल्ली ओपन स्कूलमधून त्याने दहावीची परीक्षा दिली. दुसर्‍या प्रयत्नात तो ती परीक्षा पास झाला. व्हिलचेअरवर बसून आयुष्य घालवणे सोपे नसते आणि अशा परिस्थितीत सामान्य माणसांना आपल्या असामान्य जिद्दीचे प्रदर्शन करणे त्याहून कठीण. कुणीतरी सांगितले ‘‘केदारला कॉम्प्युटर शिकवा!’’ त्याला संगणकाची आवड निर्माण झाली. घराजवळील इनफोबे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून तो वेब डिझायनिंग शिकला व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेचा डिप्लोमा घेतला. डावा हात अजिबात वापरता येत नाही आणि उजव्या हाताची फक्त ३ बोटे वापरता येत असून केदारला शिक्षणापासून दैवही थांबवू शकले नाही. आईच्या पॅथोलॉजी नोटस् लिहिता लिहिता केदारचे इंग्रजीही सुधारत चाललेले. ‘‘मला सतत काहीतरी करत राहयाचे आहे’’ असे तो सांगतो. एकदा सुहासिनीताई सुधा मूर्ती यांचे पुस्तक ‘वाईज ऍण्ड अदरवाईज’ वाचत होत्या. सहज त्यांच्या मनात आले की केदार ‘ब्रेल’ लिपीत हेच पुस्तक लिहू शकेल. सॉफ्टवेअर्सचेही ज्ञान तो जमा करत असल्यामुळे बसल्या बसल्या तो ते फार चांगले करू शकेल. त्यांनी सुधा मूर्तींना पत्र लिहून ती इच्छा व्यक्त केली व सुधाजींनी ती मान्यही केली. त्यानंतर केदार थांबला नाही. सुधा मूर्तींच्या ८ पुस्तकांचा अनुवाद त्याने ब्रेल लिपीत केला. मराठी व हिंदी पुस्तकांचेही अनुवाद करता यावेत म्हणून त्याने देवनागरी लिपीही शिकली. कित्येक अंध शाळांना ही पुस्तके वाटली जात आहेत. त्याच्या कामगिरीसाठी त्याला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. ‘‘आधार दिला की खूप आधार मिळतो.’’ हे त्याच्या जीवनाचे सूत्र आहे. क्रिकेटचे वेड असल्यामुळे मॅच असली की केदारला अजिबात वेळ नसतो. प्रत्येक बॉल न चुकता पाहातो तो. नागपूरला संपूर्ण क्रिकेट टीमशी भेट झाली तो त्याच्या आयुष्यातील सोनेरी दिवस होता. त्याला वेगळे व कमकुवत समजून शिकवले नाही जायचे शाळेत. त्यावेळी त्याला अत्यंत त्रास व्हायचा. शिकण्याची इच्छा आणि नशिबाचा खेळ याचा एकमेकांशी काही संबंध नसला तरी केदारला या दोन्हींचे चटके खावे लागले. आजही केदारला सामान्य जीवन जगावेसे वाटते, बाहेर फिरावेसे वाटते, पण तसे शक्य नाही हे त्याने स्वीकारले आहे. ‘‘मी हॅपी गो लकी आहे’’ असे तो सांगतो. फेसबुक, ऑर्कुट, ट्वीटरवर त्याने खूप मित्रमंडळी जमा केली आहेत. सध्या प्रत्यक्षात लोकांची भेट होत नाही. केदारने त्याचे जग आखले आहे व तो त्या जगात स्वच्छंदपणे वावरतो. अजून चांगली चांगली पुस्तके ब्रेल लिपीत करण्याची त्याची इच्छा आहे. त्याला नोकरी करावीशी वाटते, पण परिस्थिती लक्षात घेता ते जमणार नाही याची कल्पना त्यालाही आहे. स्वप्न मात्र आहेच.

‘‘घरबसल्या जेवढे जमेल तेवढे काम करणार मी,’’ हा त्याचा निर्धार आहे. फक्त काम नाही तर समाजात त्याच्याकडून कुणाला मदत होणार असेल तर तीही त्याला करता यावी अशी त्याची प्रार्थना आहे. एका व्हिलचेअरवर बसून फक्त तीन बोटांचा वापर करता येत असला तरी केदारचे आयुष्य सार्थकी लागले असे म्हणता येईल. त्याच्या श्रेयात वसंत इंदूरकर, सुहासिनी व केतकी यांचाही सहभाग विसरणे गैर ठरेल. केदारची जिद्द आणि जगण्याची धडपड पाहून खूप प्रोत्साहन मिळते. केदार म्हटले की मला एक श्‍लोक आठवतो,

‘‘त्रीदलम् त्रीगुणाकारम्, त्रीनेत्रच् त्रीवायदम्,
त्रीजन्म पाप संहारम्, एक बिलवम शिवार्पणम्’’

तीन हा आकडा आपण फार चांगला समजत नाही, पण संकटाचा विनाश करण्यासाठी शंकर भगवान तिसरा डोळा उघडतात व शक्ती, भक्ती आणि श्रद्धेपोटी त्यांना जो बेल वाहिला जातो त्याची पानेही तीन. त्रिदलांच्या त्रिगुणाकाराचीच कृपा असावी केदारवर. कारण आज त्याचे आयुष्य चालले आहे ते त्याच्या ३ बोटांवर. नशीबवान असतील अशी कुटुंबे ज्यांच्या घरी असे शंकराचे बेल जन्म घेतात.

॥ नम: शिवाय॥

One thought on “शंकराचा बेल

Comments are closed.