ज्ञान आणि कौशल्य वाटणे ! परकीय आणि आपण !

पोर्ट्रेट पेंटींग चे बारकावे

कॉलेजला असताना असाईनमेंट सोडून इतर कामात खूपच रस असायचा. कॉलेज कँटीन मध्ये असली दाखवा दाखवी व्हायची ! कुणी वॉटर कलर मधले निसर्गचित्र घेऊन यायचा, तर कुणी इंक मधील काम घेऊन यायचा ! त्याकाळी आणि आजही मला पोर्ट्रेट या विषयात भयंकर रस होता. आम्हाला सिनियर असलेली अनेक मंडळी थोड्याशा आढत्येखोरपणे आपले ‘वर्क’ दाखवीत आम्हाला खिजवीत असत. एखादा निगवेकर पोस्टर कलर मध्ये केलेले काम दाखवी आणि सुर्याप्रकाशाकडे ते काम नेऊन, ते पुढून जसे दिसते तसेच पाठूनही कसे दिसते हे दाखवीत सगळ्यांना अचंबित करीत असे. पोस्टर कलर कितीही जपून हाताळला तरीही त्यात पॅचेस येणे काही चुकत नसे. मग मनाचा हिय्या करून त्याला विचारले की तो हसत एकच डायलॉग नेहमी मारत असे,” अरे काम करा, टिप्स कसल्या मागता ?

हे काही आंडू-पांडूचे काम नाही !” आणि कुजकट हसे. हाच अनुभव मला या क्षेत्रात काही सन्माननिय अपवाद वगळता कायम आला. स्क्रीन एक्स्पोज करणारा एक्स्पोज करताना आपल्याला हमखास डार्क रूम मधून बाहेर काढणारच याची खात्री असे. आपल्याकडे, किंवा आपल्याला प्राप्त झालेले कौशल्य इतरांना न देण्यात धन्यता वाटणारे अनेकानेक महाभाग पाहिले आहेत. कदाचित त्यांना एका असुरक्षिततेचे ‘फिलिंग’ सदोदित असल्याने या गोष्टी घडत असाव्यात. कारण एकदा मी मला ज्युनियर असलेल्या मित्राला इंक कशी हाताळावी यावर एक छोटेखानी लेक्चर दिले. तो आभार मानून उठून गेल्यावर मागच्या बाकावरचा रवी रुमडे माझ्यापाशी येऊन कुजबुजला,” च्युतीया, अशी आपली सिक्रेट्स कुणाला सांगायची नसतात !” माझ्या ”का ?” या प्रश्नावर त्याने दिलेले हास्यास्पद उत्तर आजही मला आठवते ! ” साल्या, तो तुझ्या पुढे जाईल ना !” हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर दयेचे भाव होते ! मला कळेना, मला दोन वर्षे ज्युनियर असलेला तो सतीश माझ्या टिप्स मुळे मला ओलांडून पुढच्या वर्षी कसा काय जाईल ? मला त्या रवीची खूप दया आली. आज मी, लहानपणी निश्चित केलेल्याच क्षेत्रात काम करतोय आणि तो रवी कोकणातील कुठल्या तरी सहकारी बँकेचे राजकारण ! तो सतीश आजही माझ्या टिप्स घेतोय ! सांगायचा मुद्दा हा की, नेटचा वापर वाढल्यावर, त्यावर सराईतपणे वावर सुरु झाल्यावर ” हाऊ टू डू दिस ?” या सदराखाली टाईप केल्यावर, या पाश्चात्य मंडळींनी नेटवर लोड केलेल्या विषयांची जंत्री ‘अबब ‘ या खाली मोडणारी.

कॉलेजला असताना केवळ एक असाईनमेंट करायची म्हणून कसाबसा पूर्ण केलेल्या ‘सॉफ्ट ड्राय पेस्टल ‘ च्या त्या अवघड असाईनमेंट नंतर त्या विषयाच्या वाटेला जायचे नाही असे ठरवले होते. किती कठीण ! आपले खडू काहीच्याकाही कडक असतात ! अत्यंत ठिसूळ अशा या माध्यमाने काही चितारणे मला नेहमीच अवघड, कठीण वाटत आलेले. ओईल, अक्रीलिक, इंक, फोटो इंक, वॉटर कलर, कलर पेन्सिल, पोस्टर कलर, ओईल पेस्टल, पेन्सिल, चारकोल या सर्व माध्यमातून अनेक अवघड असाईनमेंट त्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यात मी पार पडल्या. पैसे घेऊन कला प्रसवणे हे किती कठीण काम, तेही आपल्या देशात ! हे आमच्यासारख्या कलाकार मंडळींनाच ठाऊक ! ही माध्यमे हाताळीत असताना चुकूनही मी त्या ड्राय पेस्टलच्या वाटेला गेलो नाही. त्यादिवशी सहज सर्फिंग करताना ही ‘हाऊ टू ‘ लिंक आली. त्यात टाईप केले,” ड्राय पेस्टल ” तर त्यात माहितीचा खजिना हाती लागला. त्या माध्यमासाठी कुठला बोर्ड निवडावा, कुठून कसे काम सुरु करावे, काम करत असताना कुठल्या काळज्या घ्याव्या इथपासून ते विषयापर्यंत सर्व बाबींना स्पर्श करणारी, सखोल माहिती हाती लागली. पुन्हा त्या गोष्टी समजावून सांगण्याची हातोटी आणि त्याचे नमुने अचंबित करणारे. केवळ हाताचे बोट धरून शिकवणे बाकी ! आपल्याकडील या लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर हे सगळे स्वप्नवत वाटणारे ! ज्ञान आणि कौशल्य वाटण्याने, आदान प्रदानाने वाढीस लागते ही मुलभूत बाब विसरणार्‍या आपल्या देशी बांधवांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही मायाजालावरील माहिती केवळ अद्भुत अशीच ! केवळ एक नमुना आपल्यासाठी ! आपल्याकडे असलेले ज्ञान बिनदिक्कतपणे समोरच्यास द्यावे व ते कसे ? याची ही एक झलक ! ज्यामुळे प्रेरित होऊन मी न घाबरता त्या ड्राय पेस्टल या अक्राळ विक्राळ माध्यमाकडे वळलो !

ही माहिती इथंभूत देणाऱ्या या महान कलाकाराला मानाचा मुजरा !