शेतकरी आणि गरुड

एके दिवशी एक शेतकरी रानात फिरत असता, काटेऱ्या झुडपात अडकलेला एक गरुड पक्षी त्याने पाहिला. त्या पक्ष्याचे सौंदर्य पाहून त्याला त्याची दया आली त्याने त्याला त्या काटेझाडापासून सोडवून मोकळे केले.

गरुडाने भरारी मारली आणि तो उंच आकाशात उडून गेला. इकडे तो शेतकरी, उन्हाचा ताप टाळावा म्हणून एका पडक्या भिंताडाच्या सावलीत जाऊन बसला. काही वेळाने तो गरुड खाली उतरला आणि त्या शेतकऱ्याची कांबळी आपल्या गवते धरून पळत सुटला.

काही अंतरावर जाऊन ती कांबळी त्याने खाली टाकून दिली. हा एकंदर प्रकार पाहून, त्या गरुडाच्या कृतघ्नतेबद्दल त्या शेतकऱ्यास मोठा राग आला. तो बसल्या जागेवरून उठला आणि आपली कांबळी घेऊन पुनः त्या पडक्या भिंताडाकडे जाण्यास निघाला.

परंतु तेथे येऊन पाहतो, तो ते भिंताड त्याच्या दॄष्टीस पडेना. ते कोसळून पडल्यामुळे तेथे मातीचा एक मोठा ढीग मात्र पडला होता. तो पाहून, गरुडाने आपला जीव वाचविला, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली, आणि त्या मुक्या प्राण्याच्या कृतज्ञतेची तारीफ करीत आपल्या घराकडे चालता झाला.

तात्पर्य : सत्कार्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही.