शेतकरी आणि रानडुक्कर

एका शेतकऱ्याने जाळे लावून त्यात एक रानडुक्कर पकडला व त्याचा एक कान कापून त्यास सोडून दिले. पुनः लवकरच तो रानडुक्कर त्याच जाळ्यात सापडला असता, शेतकऱ्याने त्याचा दुसरा कान कापला आणि त्यास सोडून दिले. पण पुनः लवकरच तो रानडुक्कर तिसऱ्यांदा जाळ्यात सापडला. त्यावेळी त्या शेतकऱ्याने त्यास ठार मारून, त्याचे मस्तक फोडून पाहिले, तो त्यात मेंदू मुळीच नाही, असे त्याच्या दृष्टीस पडले. मग तो आपल्या मित्रमंडळीस म्हणाला, ‘अहो, याच्या डोक्यात मेंदू नाही, अशी शंका मला पूर्वीच आली होती. कारण, याला जर काही अक्कल असती तर दोन वेळा दोन्ही कान कापल्यावर, हा पुनः माझ्या जाळ्यात कधीही सापडला नसता.’

तात्पर्य:- ज्याच्या मनावर उपदेशाचा काडीमात्र परिणाम होत नाही, किंवा ज्याला शिक्षेची मुळीच आठवण रहात नाही, असा महामूर्ख मनुष्य कधी तरी शहाणा होईल, अशी आशा करणे व्यर्थ आहे.