शेतकरी आणि ससाणा

एक ससाणा एका कबुतराच्या मागे लागला होता, तो अकस्मात्‌ एका शेतकऱ्याच्या जाळ्यात सापडला. मग तो शेतकऱ्यास म्हणतो, ‘दादा, मी तुझा कोणताही अपराध केलेला नाही, हे लक्ष्यात घेऊन तू मला सोडून दे. यावर शेतकरी उत्तर करतो, ‘अरे, तू माझा अपराध केला नाहीस, ही गोष्ट खरी, पण त्या कबूतराने तरी तुझा कोणता अपराध केला होता बरे ? जो न्याय तू कबूतराला लावलास त्याच न्यायाने मी तुला आता शिक्षा करणार.’

तात्पर्य:- मनुष्यमात्राने बोलण्यापूर्वी चांगला विचार करावा, नाहीतर अविचाराने केलेले भाषण उलट आपल्याच गळ्यात येण्याचा संभव असतो.