शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा

एका मनुष्यापाशी दोन कुत्रे होते, एक गावठी आणि एक शिकारी. धन्याबरोबर शिकारीस जाऊन, शिकारी कुत्र्याने एखादे सावज मारून आणिले म्हणजे त्याचा काही भाग घरी ठेवलेल्या गावठी कुत्र्यास मिळत असे. एके दिवशी शिकारी कुत्रा घरच्या कुत्र्यास म्हणाला, ‘अरे, मी एवढी मेहनत करून जी सावजे मारून आणतो, त्याचा भाग तुला घरी बसून खायला मिळावा, हा धडधडीत अन्याय होय.’ यावर दुसरा कुत्रा उत्तर करितो, ‘गडया, हा माझा अपराध नव्हे, माझ्या धन्याचा होय. कारण त्याने माझी योजना शिकारीकडे न करता, घर राखण्याचे काम मजकडे सोपविले आहे.’

तात्पर्य:- नोकरीचे प्रकार अनेक आहेत. अमुक एक प्रकारचे काम केले म्हणजे ती नोकरी होते आणि अमुक प्रकारचे केले म्हणजे ती नोकरी नव्हे, असे म्हणता येणार नाही.