शिंपले

समुद्राकांठी रहाणारे कांही लोक शिंपल्यांतले मांस खातात. एकदा, आंतले मांस काढून घेतलेला एक मोठा शिंपला समुद्रकिनाऱ्यावर पडला होता, तो सूर्याच्या प्रकाशांत मोत्यांसारखा चमकत होता. तो शिंपला पाहून एक लहान शिंपला आपल्या आईस म्हणतो, ‘आई हा शिंपला किती तेजस्वी आणि सुंदर आहे, पाहिलास का ? सौंदर्यांत आणि चकचकीतपणांत याची बरोबरी समुद्रांतील दुसरा कोणताही प्राणी करूं शकेल असे वाटत नाही. आई, मी मोठा होऊन याच्यासारखा दिसू लागण्यास आणखी किती वर्षे गेली पाहिजेत कोण जाणे ! इतकी वर्षें वाट पाहता पाहता मी तर अगदी कंटाळून जाईन. ’ हे ऐकून त्याची आई त्यास म्हणाली, ‘खुळ्या पोरा ! ह्या शिंपल्याची अशी स्थिती होण्यास हे त्याचे सौंदर्यच कारण झाले आहे, हे तुझ्या लक्षात कसे येत नाही ? तू जेव्हा याच्यासारखे लठ्ठ होऊन असे चकचकीत दिसू लागशील तेव्हा तुझे मांस खाण्यासाठी लोक तुला असेच मारून टाकतील. यासाठी, जो मोठेपणा तुझ्या नाशास मात्र कारण होणार, त्याची अपेक्षा तू फारशी करू नयेत, हेच चांगले. ’

तात्पर्य:- लहानपण दे गा देवा / न चले कोणाचाही हेवा. ’