पुण्यातला युवक साकारतोय शिवचित्रसृष्टी

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

ठिकठिकाणी शिवसृष्टी उभारण्याबाबत प्रस्ताव दिले जात असून त्यावर चर्चाही होत आहेत. मात्र, वेल्हा तालुक्यातील विंझर या गावातील चित्रकलेचा विद्यार्थी अमित सागर स्वतःच्याच जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून कुठल्याही मदतीची त्याला अपेक्षा नसून शिवप्रेमींच्या पाठबळावरच ही शिवसृष्टी आकाराला आणण्याची त्याची इच्छा आहे.

अमित सागर कात्रजच्या साई कला महाविद्यालयात जी. डी. आर्ट शिकत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या विंझर गावात शिवसृष्टी उभारण्याची त्याची मनीषा आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. विंझरला अमितची पाच एकर जागा असून, त्यातल्याच एका एकरात तो हा प्रकल्प उभा करतोय. यात पाचशे स्क्वेअर फुटांच्या जागेत एक सभागृह तयार केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनची सुमारे २०० चित्रे यात लावली जाणार आहेत. बाग आणि तटबंदी सभागृहाच्या आजूबाजूला उभारले जातील.

अमितने सांगितले की, ‘शिवप्रेमामुळेच मी हे धाडस करत आहे. इतर शिवसृष्टींमध्ये चित्रसृष्टी हे वेगळेपण आहे. तसेच, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. शिवाजी महाराजांनी बराच काळ याच गडावर व्यतित केला होता. त्याबाबत या भागात कुठलेच स्मारक किंवा स्मृतीस्थान नाही. सईबाईंच्या स्मारकाची गडावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व मला चित्रांच्या माध्यमातून दाखवून चित्रसृष्टी उभारायची आहे व त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत.’

‘कोणत्याही आर्थिक पाठबळाची मला सरकारकडून अपेक्षा नाही. माझा ठाम विश्वास आहे की शिवप्रेमींच्या आर्थिक आधाराने ते शक्य होईल,’ असेही तो म्हणाला. त्याने हे ही नमूद केले की, या कामी त्याला प्रा. नंदकुमार सागर, संजय जगताप, डॉ. अनिल नलावडे, अनिल भुरुक, वाय. जी. पटवर्धन, संभाजी भोसले, आणि दत्तात्रय देशमाने यांचे सहकार्य लाभत आहे.