श्रीगणेशाच्या अष्टावताराच्या कथा

मुद्गल पुराणात श्रीगणेशाच्या अष्टावतारच्या कथा सांगितल्या आहेत, त्यापुढीलप्रमाणे

इंद्राच्या वीर्यपतनापासून ‘मत्सरासुर’ निर्माण झाला. या मत्सरासुराने सर्व देवांचा पराभव केला. त्यामुळे देव दीन झाले आणि त्यांनी गणेशाची आराधना केली. तेव्हा गणेशाने ‘वक्रतुंड’ अवतार घेऊन मत्सरासुराचा पराभव केला व त्याच्याकडून ‘निष्काम कर्म करणाऱ्याच्या वाटेला जाणार नाही’ असे वचन घेतले.

सृष्टीनिर्मात्या ब्रह्मदेवाला एकदा ‘मी मोठा’ असा गर्व झाला. तेव्हा त्याच्यापासून दंभासुर जन्माला आला. या असुराने सर्व देवांना त्राहीत्राही करुन सोडले तेव्हा सर्व देवांच्या विनंतीवरुन गणेशाने ‘ऋद्धिसिद्धिपति’ या नावाने अवतार घेऊन दंभासुरावर विजय मिळविला.

भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रुप घेतले. मोहिनीच्या सौंदर्यावर शंकरही भाळले. परंतु विष्णूने आपले मूळ रुप धारण करताच शंकर निराश झाले. त्यांच्या गलितवीर्यापासून एक तांबड्या डोळ्यांना काळा कभिन्न असूर निर्माण झाला तो म्हणजे ‘क्रोधासूर’ या असुराने ब्रम्हांडावर विजय मिळविण्यास सुरुवात केली. तेव्हा गणपतीने ‘लंबोदर’ अवतारात प्रकटून क्रोधासुरास शांत केले.

सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाला मोह निर्माण झाला. तेव्हा त्याच्या श्वासापासून ‘मायाकर’ नावाचा असुर निर्माण झाला. त्याने त्रिलोक जिंकला. तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी शेषाच्या हृदयातून गणेश ‘लंबोदर’ रुपात प्रकटले. लंबोदराने आपल्या हातातील बिंदुरुप आणि ज्योतिरुप कमळाने मायाकराला ठार मारले.
शंकर सर्वस्वी आपल्याच स्वाधीन आहेत असा विचार मनात येऊन पार्वती एकदा आपल्याच मनाशी हसली. तिच्या या हसण्यापासून ‘ममासुर’ असुर निर्माण झाला. याला मारण्यासाठी गणेशाने ‘विघ्नश्वर’ अवतार घेतला.

एकदा सुर्याला शिंक आली आणि त्याच्या शिंकेतून ‘अहम’ नावाचा असुर उत्पन्न झाला. या असुराचे पारिपत्य करण्यासाठी गणपतीने ‘धूम्रवर्ण’ अवतार घेतला.

एकदा शंकर-पार्वती कैलासावर बसले असता कुबेर तेथे आला. तेथे असलेल्या पार्वतीच्या सौंदर्यावर तो मोहीत झाला व तिच्याकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या या कृत्यातून ‘लोभासुर’ नावाचा असुर निर्माण झाला. या लोभासुराने त्रैलोक्यातील सर्वांना हैराण केले. तेव्हा ‘गजानन’ अवतारात प्रकट होऊन गणेशाने लोभासुराला पाताळात दडपले.

शंकर एकदा भिल्लिणीच्या मागे लागले तेव्हा ‘मोहासुरा’चा जन्म झाला. त्याने सूर्याकडून वरदान मिळविले. त्याने देवांवर विजय मिळविला. त्रैलोक्य जिंकले. त्यामुळे देव घाबरले. त्यांनी गणेशाचा धावा केला. तेव्हा गणेशाने ‘महोदर’ अवतार धारण करुन मोहावर ताबा मिळविला आणि देवांना व त्रैलोक्याला भयमुक्त केले.

या आहेत गणपतीच्या अष्टावतार कथा. गणेशाने ज्याप्रमाणे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, माया, अहम या षडरिपूंवर जय मिळविला. त्याप्रमाणेच आपणही या षडरिपूंवर ताबा मिळवून आपले जीवन समाधानी, सुखी करु शकतो. अशीच शिकवण आपल्याला या कथांतून मिळते. श्रीगणेशाच्या फक्त नामस्मरणामुळेही आपल्या सर्व दुःखाचा नाश होऊन आपले जीवन सुखी-समाधानी होते.

लंबोदर