संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन

श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे

आपल्या सर्वांगसुंदर रचनांनी उभ्या महाराष्ट्राला संमोहित करणारे संगीतकार श्रीनिवास खळे यांचे आज (शुक्रवार) त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

खळे काकांनी मराठी चित्रपट सृष्टीवर आपल्या संगीताचा ठसा उमटवला. श्रीनिवास खळे यांनी मराठी व्यतिरीक्त हिंदी, बंगाली, गुजराती, संस्कृत भाषांतील गाण्यांना संगीत दिलं आहे.

श्रीनिवास खळे यांनी १९५८ सालाच्या ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटापासून संगीत देण्यास सुरुवात केली. ‘श्रावणात घन निळा’, ‘निज माझ्या नंदलाला’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘सावळे सुंदर रुप मनोहर’ यांसारख्या अनेक गाण्यांना खळेकाकांनी स्वरबद्ध केलं. शिवाय ‘बोलकी बाहुली’, ‘जिव्हाळा’, ‘सोबती’ अशा चित्रपटांमधून त्यांची अनेक लोकप्रिय आणि तरल गाणी मराठी चित्रसृष्टीला मिळाली. ‘शुक्रतारा’, ‘हात तुझा’, ‘सर्व सर्व विसरू दे’, ही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी विशेष गाजली.

खळे यांना राज्य सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार, सुधीर फडके पुरस्कार,
बालगंधर्व पुरस्कार, स्वररत्न पुरस्कार तसेच दत्ता डावजेकर पुरस्कारचाशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. “बाजे रे मुरलिया बाजे’ हे खळे यांने स्वरबद्ध केलेले गाणे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिले होते. “”माझ्याकडे दोन भारतरत्नांनी एकत्र गाणे गायिले आहे,” असे खळे गमतीने म्हणत असत.