सिंह आणि बैल

एकदा एका सिहाच्या मनात आले की, एका लठ्ठ बैलास मारून खावे. मग त्याने त्या बैलास मोठया आदरसत्काराने आपल्य घरी मेजवानीस येण्याची विनंति केली. तो त्यास म्हणाला, ‘मित्रा, माझ्या घरी एक फारच रुचकर पकान्न केले आहे, ते तुलाहि खाऊ घालावे अशी माझी इच्छा आहे.’ बैलाने ती विनंति मान्य केली व तो सिंहाबरोबर त्याच्या घरी गेला.

तेथे पाहतो, तो, मोठमोठी भांडी, तवे आणि स्वयंपाकाच्या इतर वस्तु स्वयंपाकासाठी तयार ठेवलेल्या त्याच्या दृष्टीस पडल्या. तो प्रकार पाहून बैल पळत सुटला. तेव्हा सिंह त्यास म्हणतो, ‘गडया, असा पळून का चाललास ?’ बैल उत्तर करतो, ‘ही सगळी सामग्री पाहून माझी खात्री झाली की, तुझे ते पक्कान्न म्हणेज बैलाचे मांसच असले पाहिजे; तेव्हा त्या पक्कान्नात माझे रूपांतर होण्यापूर्वीच मी पळून जावे, यात काही आश्चर्य नाही.’

तात्पर्य:- आपणास फसवून आपला घात करावा असे इच्छिणाऱ्या माणसाच्या गोड थापास भुलून जरी आपण त्याच्या जाळयात सापडलो, तरी त्याच्या दुष्ट हेतूचे चिन्ह दृष्टीस पडताच, तत्क्षणीच सावध होऊन तेथून निसटावे हा शहाणपणा होय.