सिंह आणि बेडूक

एक सिंह सरोवरावर पाणी पिण्यास गेला असता, तेथे एका बेडकाचे ओरडणे ऐकून त्यास फार भय वाटले. मग चोहींकडे पाहून तो मनांत म्हणतो, ‘येथे तर कोणीही प्राणी दृष्टीस पडत नाही, आणि शब्द तर राहून होतो तेव्हा हे काय असावे बरे ?’ असे म्हणून तो भयाने कापू लागला. परंतु तेथून पळून न जाता, धीर धरून विचार करतो आहे, इतक्यात तो बेडूक पाण्यांतून ओरडत बाहेर निघाला. त्यास पाहताच सिंहास मोठा क्रोध आला. तो आपल्याशीच म्हणाला, ‘या एवढयाशा प्राण्याने मजसारख्यास असे भिववावे काय ?’ मग त्याने त्या बेडकास आपल्या पंजाने एका क्षणांत फाडून टाकले !

तात्पर्य:- एखादे वेळी भय उत्पन्न झाले, तर त्या भयाचे मूळ कारण काय आहे, याचा बारकाईने शोध करावा, म्हणजे आपल्या भयाचे कारण अगदी क्षुल्ल्क आहे, असेच बहुतकरून आढळून येईल.