सिंह आणि गाढव

गाढवस बरोबर घेऊन शिकारीस जावे, असे एका सिंहाच्या मनात आले. त्याने गाढवास सांगितले, ‘अरे, तू रानात जाऊन एकसारखा ओरडत राहा. तुझी ओरड ऐकून जी जनावरे पळू लागतील त्यांची शिकार मी करतो.’ गाढवाने ती गोष्ट कबूल केली व रानात जाऊन, नानाप्रकारचे वेडेवाकडे सूर काढून तो सारखा भुंकत सुटला. त्याची ओरड ऐकून पुष्कळ जनावरे इकडेतिकडे पळू लागली, त्या सर्वांची सिंहाने कत्तल उडवली व कंटाळा आल्यामुळे शिकारीचे काम बंद केले. मग गाढव सिंहास पुसतो, ‘मी माझे काम कसे काय केले ?’ सिंह उत्तर करतो, ‘गडया, तू आपले काम फार उत्तम प्रकारे केलेस, तू गाढव आहेस हे जर मला माहित नसते, जर तुझी ओरड ऐकून मलाही मोठे भय वाटले असते.

तात्पर्य:- थोडयाशा कर्तबगारीबद्दल मोठा गर्व करणे हे मूर्खपणाचे लक्षण होय.