स्त्रि व अंगावर पांढरे जाणे

अंगावरून पांढरा स्त्राव जाणं म्हणजेच ल्यूकोरिया आणि यामुळेच योनीमार्गाचा बाहेरील भाग जास्त प्रमाणात ओला राहतो. हा पांढरा स्त्राव किंवा हा जादा ओलसरापणा कोणत्याही वयात होऊ शकतो. जन्माच्या पहिल्या दिवसापासूनही मुलीच्या अंगावर पांढर जात असल्याची उदारहरणं आढळत असतात. ज्या अर्भकाच्या अंगावर पांढरं जात असतं, तिची आई किंवा नर्स यांच्या ते लक्षात येऊ शकतं. चार पाच वर्षापर्यंतच्या मुलीच्या अंगावर जात असेल तर, तेही आई किंवा नर्सला समजू शकतं. कारण या वयापर्यंतच्या मुलीची अंघोळ, स्वच्छता त्याच करीत असतात. चौदा दिवसांपर्यंत ज्या मुलींच्या अंगावर जातं तो पांढरा स्त्राव जास्त चिकट असू शकतो. अर्थात हा स्त्राव लक्षात आल्यावर त्याची गंभीर दखल घेण्यासारखं काही नसतं. निर्जंतूक कापसाच्या बोळ्यानं तो अवयव स्वच्छ ठेवावा एवढी काळजी मात्र घ्यावी. इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता नाही. जवजात अर्भकाच्या अंगावर पांढरा स्त्राव जायचं कारण म्हणजे आईची हार्मोन्स अर्भकाच्या रक्तात मिसळतात.

पाच वर्षांवरची मुलगी, पांढरा स्त्राव होऊ लागला, तर त्याबद्दल आईला सांगू शकते. परंतु तरीसुद्धा वयाच्या बारा वर्षांपर्यंतच्या काही मुलींना डॉक्टरांकडे नेलं जातं. कारण या वयातही बऱ्याच मुली अशा स्त्रावाबद्दलची तक्रार करीत नाहीत. वाढत्या मुलींच्या बाबतीत असा स्त्राव जाऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. डॉक्टरांनी पूर्णपणे आतून तपासणी करणही काही वेळा आवश्यक असतं. कारण योनीमार्गात बियासारख्या वस्तू अडकलेल्या नाहीत ना याची खात्री करून घेता येते. शाळेतील मोठ्या मुली  आणि लग्नाच्या आधीच्या मुली अंगावर जास्त पांढर जाण्याबद्दल तक्रार करतात. त्याची, लग्न झालेल्या स्त्रियांची तपासणी जशी करतात, तशी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. पांढरं जाण्याची काही कारणं लग्न झालेल्या आणि अविवाहित स्त्रियांच्या बाबतीत सारखी असू शकतात.

जास्त स्त्राव केव्हा होतो ?
कधी जास्त प्रमाणात अंगावर जाउ लागतं. तेही तसं त्यावेळेपुरतं नॉर्मलच असतं. हा काळ म्हणजे –
(१) वयात आल्याबरोबरचा काळ.
(२) मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी किंवा बंद होण्यापूर्वीचा काळ.
(३) दोन पाळ्यांमधील दोनतीन दिवसांचा काळ, यातला स्त्राव चिकट असतो.
(४) लैंगिक भावना उद्दीपित झाल्यावर किंवा समागम झाल्यानंतरचा काळ.
(५) गर्भारपणाचा काळ.
(६) बाळंतपणानंतरचा २ ते ४ आठवड्यांचा काळ ( म्हणजेच रक्तस्त्राव थांबल्यावर )
या काळातील अंगावर जाण्याचं प्रमाण जास्त नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. पण नंतर केव्हा डॉक्टरांकडे स्त्री जाईल तेंव्हा ती घटना त्यांच्या कानावर घालावी हे उत्तम.

स्त्रावाचे स्वरूप व कारणे
अंगावर जाण्याचं स्वरूप- म्हणजे कमी जास्त प्रमाण, कमी अधिक चिकटपणा, रंग स्त्रीनं डॉक्टरांना अचूक सांगण आवश्यक आहे. स्त्राव कधी पातळ, तर कधी चिकट, घट्ट, बारीकबारीक कणांच्या स्वरूपातही असू शकतो. अंगावर जात असताना इतर आणखी काही लक्षणे दिसत असतात. घाण वास येणं, कंबर दुखने, योनीमार्गाची जळजळ होणं, टोचत राहणं, योनी मार्गाच्या बाहेरचा भाग काहीवेळा ओला झालेला व सुजलेला आढळतो. अशा तऱ्हेच्या तक्रारी अचानक उद्भवतात असं वाटलं, तरी बहुतेकवेळा त्या खूप जुन्हाही असू शकतात. योनीमार्ग किंवा गर्भाशयमुखाशी जंतुसंसर्ग झाल्यामुळं अंगावर पांढरं जात असतं हे जंतू अत्यंत सूक्ष्म असतात. त्यात बुरशीचे जंतूही असतात हे जंतू एकमेकीत पसरायला वेळ लागत नाही. अस्वच्छ संडास, कमोड्स, मोरी किंवा एकच टॉवेल वापरणे यामुळे हे जंतू एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे जायला वेळ लागत नाही. समागमामुळेही हे जंतू पसरू शकतात आणि जंतूंचा प्राडूर्भाव वरचेवर होत राहतो. पुरुषातही हे जंतू जातात, पण सामान्यतः त्याची काहीच तक्रार नसते. बाळंतपणात योगीमार्ग योग्यपणे शिवला गेला नाही तर हे जंतू सहजपणे स्त्रीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. वाढत्या वयाच्या मुली आणि वयस्कर स्त्रियांकडून या अवयवांची नीट स्वच्छता राखली गेली नाही तर त्यांना या जंतूंचा बालपणीच संसर्ग होऊ शकतो. यासाठीच मुलांना गुदद्वार पुढच्या बाजून मागच्या बाजूला हात नेऊन धुण्याची शिकवण द्यावी. मागून, पुढे गुदद्वार धुण्याची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे मल कण पुढील भागात येऊन मूत्राशयात, योनीमार्गात जाण्याची शक्यता असते. योनीद्वारात जंतूंचा विशेषतः बुरशीच्या जंतूंचा संसर्ग हा सर्वसामान्यपणं गर्भारपणात होतो. तसंच मधुमेह असलेल्या स्त्रियांना किंवा लघवी वाटे साखर जाणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा जंतू संसर्ग गुप्तरोगामुळे होऊ शकतो. पेशंटनं जर सविस्तरपणे सर्व लक्षणं डॉक्टरांना सांगितली तर डॉक्टर तपासणी करून नेमकं  कारण ठरवू शकतात. त्यामुळे त्यावर योग्य तो उपचारही करता येतो.

उपचार पद्धती
उपचार हा अर्थातच कारणांवर अवलंबून असतो. कधीकधी तोंडातून घ्यावयाच्या गोळ्या पतिपत्नी दोघांनाही घ्याव्या लागतात. तसंच दहा ते पंधरा दिवस समागमही टाळावा लागतो. याव्यतिरिक्त आणखी जे उपचार आहेत त्यात पेंट, गोळ्या किंवा मलम यांचा समावेश होत, ( या आत ठेवायच्या असतात ) पण याचवेळी मधुमेह वगैरेसारखे विकार ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे. अंगावर जाणे हा विकार एकाच उपचाराने प्रत्येकवेळी नाहीसा करता येत नाही हे प्रत्येकीनं लक्षात ठेवायला हवं. त्यासाठी विविध चाचण्या घ्याव्या लागतात. या विकारासंबंधी इथं एक महत्त्वाचा इशारा देणं आवश्यक आहे. हा इशारा विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण, गरीब स्त्रियांना द्यायला हवा. या स्त्रिया नऊवारी साडी नेसत असतात.त्या काष्टा घालतात. त्यांना स्त्राव होतो. त्याकडे पांढरं जातं आहे म्हणून दुर्लक्ष करतात. त्यांचे साडीवर पडणाऱ्या डागाकडे लक्ष नसते. त्यात रक्ताचाही अंश असण्याची शक्यता असते, ते केवल पांढरं जाणं नसतं. काष्ट्यामुळे तिकडे लक्ष जात नसतं आणि समजतही नसतं, जर स्त्रावातून रक्ताचा अंश जात असेल तर गर्भाशयाच्या कॅन्सरची दाट शक्यता असते आणि त्या डागांकडे बऱ्याच काळपर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळं हा कॅन्सर प्रगत आणि बरा न होण्याची पायरी गाठतो. नेहमीपेक्षा केवळ जास्त प्रमाणात अंगावर जात आहे अशी समजूत स्त्रियांची होत असल्याने कॅन्सर प्राथमिक अवस्थेत उघडकीला येऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं याक्डे दुर्लक्ष न करणं तिच्याचं हिताच आहे.

2 thoughts on “स्त्रि व अंगावर पांढरे जाणे

  1. bhalchim savita

    dr. majha palicha problem ahe manje mala velevar kadhich pali yet nahi khup upay kele dr. ni sangitlya pramane 3 mahinyacha korsahi kela pan kahich farak padla nahi plz mala sallaya dya plz majhya mailvar mail send kara lovkar

Comments are closed.