स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न

एकपात्री प्रयोगात ज्याप्रमाणे एकाच कलाकाराला वेगवेगळ्या पात्रांची भूमिका वठवावी लागते त्याचप्रमाणे सध्याच्या यांत्रिक युगात स्त्रियांना प्रपंचात व नोकरीत विविध स्वरूपाच्या जबाबदाऱ्या सांभाळाल्या लागतात. वास्तविक पाहता फार पूर्वीपासूनच स्त्रिया घरकाम सांभाळून आपल्या पतीच्या कामात हातभार लावीत आल्या आहेत. इंग्लंडमध्ये इ.स. १७२४ च्या दरम्यान स्त्रियां घरगुती लोकरीच्या कारखान्यात काम करीत असल्याचा संदर्भ आढळतो. परंतु त्या वेळी स्त्रियांच्या इतर अडचणीकडे विशेष लक्ष दिले जात नसे. किंबहुना त्यांच्या कामाचा मोबदलाही अतिशय अल्प असे. इ.स. १८२३ पूर्वी स्त्रिया कोळशाच्या खाणीत पाठीवर तोपली बांधून कोळसा वाहत असत. यार्कशायरमध्ये तर स्त्रियांना कमी रोजगारात भाड्याने लावून काम करून घेत असत.

इंग्लंडमधील औधोगिक क्रांतीनंतर इ.स. १८२३ मध्ये त्या देशात औद्योगिक कायदा लागू करण्यात आला व त्यायोगे औद्योगिक क्षेत्रात होत असलेली स्त्रियांची पिळवणूक कमी झाली. भारतात जवळजवळ १२५ वर्षांनंतर म्हणजे इ.स. १९४८ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. स्त्रियांना समाजात पुरुषाच्या बरोबरीने स्थान प्राप्त झाल्याने त्यांना नवीन जबाबदाऱ्या घरी व वाहेर उचलाव्या लागत आहे. बदलत्या काळाबरोबराच दिवसेंदिवस संसाराला हातभार लावण्यासाठी कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत गेले. १९७१ च्या आकडेवारीप्रमाणे लोकसंख्येच्या ३२.९ टक्के कामगाराचे प्रमाण आहे. ११.९ टक्के स्त्रिया कामात गुंतलेल्या असतात. त्यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, कारण त्यांना दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. नवीन पिढीचे संगोपन व वाढ चांगली व्हायची असेल तर काम करणाऱ्या स्त्रियांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

स्त्रि कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न कसे व का उद्भवतात ?
कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया पुरुषाइतक्याच; नव्हे त्याहीपेक्षा जास्त जबाबदाऱ्या पार पाडीत असतात. कामावरून घरी आल्यावरसुद्धा त्यांची जबाबदारी संपलेली नसते. स्त्री ही कुटुंबाचा प्रमुख घटक असते. कामावरून घरी आल्यावर तिला घरगुती कामे मुलांची देखभाल अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. या सर्व धावपळीत दिवस केव्हा उगवतो व मावळतो याचेही तिला भान राहात नाही. आपल्या या शेतीप्रधान देशात बऱ्याचशा स्त्रिया रोजंदरीवर उन्हातान्हात शेतात राबत असतात. ह्या स्त्रियांना तर औद्योगिक कायद्याचे देखील संरक्षण नाही. गरोदरपणी नवव्या महिन्यात किंवा बाळंतपण झाल्यावर लगेच या स्त्रिया कामावर जात असतात. परिणामी स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य व लहाण मुलांची देखभाल याकडे दुर्लक्ष होते व यातूनच तिचे शारीरिक व मानसिक (ऑफिसात काम करणाऱ्या स्त्रीपासून, कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रीपर्यंत, विडी वळणाऱ्या स्त्रीपासून, शेतात काम करणाऱ्या स्त्रीपर्यंत प्रत्येकीला तिच्या या कामाच्या स्वरूपामुळे शारीरिक, मानसिक ताण पडतो आहे. )( विडी कारखाना असो किंवा इतर कारखाने असोत. शेतातील कष्टाची कामे असोत किंवा ऑफिसातील बैठी आणि बुद्धीची कामे असोत. प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने शारीरिक त्रास होतच असतो ) आरोग्य बिघडते. यातूनच अनेक विकार उद्भवतात.

नौकरी व घरकाम या दोन्ही कामामुळे स्त्रियांना विश्रांती ही जवळजवळ नसतेच. घरी आल्यावर दिवसाबरोबर उत्साहपण मावळतो. आहार हा निरोगी शरीराचा प्रमुख घटक आहे. परंतु सकाळी ऑफिसमध्ये लवकर पोहोचायचे या दडपणाखालीच ती स्र्व कामे आटोपूनघाईघाईत दोन घास पोटात ढकलते व घराबाहेर पडते. ज्या स्त्रिया डबा आणतात त्याचीही हीच परिस्थिती. लहान डबा, अवेळी जेवण, थंड झालेले अन्न हे रोजचेच होऊन बसते. संध्याकाळी घरी आल्यावर देखील जास्त स्वयंपाकाचा कंटाळाच येतो व मग काहीतरी जेवण आटोपले जाते.या सर्व प्रकारात आपण आपल्या प्रकृतीची अप्रत्यक्षपणे हेळसांड करीत असतो हे त्या विसरतात. अल्प व निकृष्ट आहार, विश्रांतीचा अभाव यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. स्त्री जर गरोदर असेल अथवा मूल अंगावर पीत असेल तर तिला भरपूर विश्रांती व सकस आहारांची गरज असते व हे जर मिळले नाही तर ते कुठल्याही रोगाला आमंत्रणच असते. त्या अजाण बालकाच्या वाढीवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात. अशा प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या आरोग्यविषयक अनेक प्रश्न उद्भवतात.

कामाशी निगडित आरोग्याचे प्रश्न व उपाय
कारखान्यात स्त्रिया व्यवस्थापनापासून ते मालाच्या वेष्टनापर्यंत सर्व कामे इतर कामगाराबरोबर करीत असतात. अशावेळी आरोग्यासंबंधीचे प्रश्न हे कारखान्याचा प्रकार व कामाचे स्वरूप यावर अवलंबून असतात. चहाच्या मळ्यात व भात शेतीत काम करणाऱ्या स्त्रियांना हातपायांना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. तसेच नेहमी पाठीवर टोपली घेऊन व वाळूत काम करावे लागत असल्याने पाठ अथवा कंबर दुखणे यासारखे विकार उद्भवतात. काही प्रयोगशाळांत काम करणाऱ्या स्त्रियांना तेथील औषधांचा त्रास सहन होत नाही व त्यामुळे अ‍ॅलर्जीचा विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बसण्याची व्यवस्था जर त्यांच्या शरीर रचनेस अनुकूल नसेल तरीसुद्धा हातपाय दुखणे, पाठ दुखणे असा त्रास होतो. एकाच जागी नेहमी एकच काम करीत राहिल्याने देखील मानसिक आरोग्य बिघडण्याची भीती असते. कारखान्यातील पॅकिंग वगैरसारख्या विभागात नेहमी एकाच प्रकारचे काम करावे लागल्याने कामाचा कंटाळा निर्माण होतो व कामातून समाधान मिळत नाही. कारखान्याच्या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे व शहरी आकर्षणामुळे मध्यम वयोगटातील कामगार शहरात येत आहेत. प्रमुख म्हणून मानलेल्या शेती धंद्यात स्त्रियांचे प्रमाण ८५ टक्के आढळते. त्यात बऱ्याचशा वयस्कर असतात. शेतात काम करताना अपघात, सर्पदंश, कीडनाशक द्रव्यांचा अतांत्रिक दृष्ट्या वापर यामुळे त्वचारोग व आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. जनावरांच्या सानिध्यात राहिल्यामुळे जनावरांपासून होणारा रोग  zoonoses  फार जिकीरीवर असतो. खेडेगावात काम करणाऱ्या स्त्रियांना औषधोपचार व वैद्यकीय मदत जवळ जवळ दुर्मिळच असते.

कामाच्या ठिकाणी भरपूर उजेड नसला तर डोळ्यांना त्रास होतो. ड्रिलिंग मशिनच्या आवाजामुळे कानावर विपरीत परिणाम होऊन चक्कर येणे, हळूहळू ऐकू कमी येणे, वगैरे आजार उद्भवतात सूती गिरणीत, तंबाखूच्या गुदामात काम करणाऱ्या स्त्रियांना श्वसनाचे विकार, होण्याची शक्यता असते. जर स्वसंरक्षणार्थ नाकाला विशिष्ट प्रकारचा  Mask  किंवा इतर कामात हातमोजे न वापरल्यामुळे आरोग्यास धोका होण्याची शक्यता असते.

औद्योगिक कायद्याने स्त्रियांसाठी बऱ्याचशा तरतुदी केल्या आहेत. उदा. गरोदरपणी किंवा बाळंतपणानंतर स्त्रियांना हक्काची पगारी रजा देण्यात येते. तसेच लहान मुलांच्या संगोपनासाठी कारखान्यात बालसंगोपन केंद्र स्थापन करून दर २ ते ३ तासांनी मुलांना पाजण्यासाठी कामातून ५ ते २० मिनिटे सुटी देण्याची कायद्यात तरतुद आहे. काही व्यवसाय उदा. खाणी, विषारी द्रव्ये तयार करण्याचे कारखाने या सारख्या जागी स्त्रियांना काम करू दिले जात नाही. अशा रीतीने बरेचसे आरोग्यासंबंधीचे प्रश्न या कायद्याद्वारे सोडविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. असे असले तरीसुद्धा आपल्याकडे कारखान्याच्या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे काही मोठे कारखाने वगळता लहान व मध्यम कारखान्यात या सुविधा दिल्या जात नाहीत अथवा त्याची अमलबजावणी केली जात नाही. या औद्योगिक कायद्याची कडकपणे अमलबजावणी केली गेली तर कामगार स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यास खुपच मदत होईल.

कामामुळे मानसिक ताण व त्यातून निर्माण होणारे प्रश्न
दिवसेंदिवस वाढत्या मुलभूत गरजामुळे स्त्रियांसाठी नोकरी करणे अपरिहार्य झाले आहे. त्यातून वाढत्या महागाईमुळे सर्वच कुटुंबाला घरकामासाठी नोकर ठेवणे परवडत नाही. त्यामुळे कामावरून आल्यावरही प्रपंचाचा त्रास स्त्रियांना सुटत नाही. कामाच्या धावपळीत मुलांची हेळसांड होते. मानसिक तोल जाऊ लागतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे, मुलांवर राग काढणे यासारख्या गोष्टी घडतात व परिणामी कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते क्वचित प्रसंगी ऑफिसमधील कामाचा राग घरी काढणे किंवा घरातील भांडणामुळे कामावर लक्ष न लागणे, चुका करणे इ. गोष्टी घडतात व याचे परिणाम गंभीर देखील होतात. निष्काळजीपणे कामे केल्यामुळेच बरेचसे अपघात होत असतात हे आपणास दिसून येते.

आज स्त्री ही पुरुषाइतकेच धडाडीने काम करीत असते व कुठल्याही क्षेत्रात ती पुरुषापेक्षा ती मागे नाही. त्यामुळे मानसिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी स्त्री दिवसभर घरी रहात असल्याने भरपूर विश्रांती, फावल्या वेळात शेजाऱ्याकडे गप्पा वगैरे मारणे, मुलांची देखभाल या सर्व गोष्टी ती करीत असे. आज स्त्री ही दिवसभर ऑफिसात व नंतर घरकामात मग्न असते. नोकरीमुळे कोठे जाणे येणे नातेवाईकांकडे, फिरायला, किंवा एखाद्या समारंभात इत्यादी सामाजिक जबाबदाऱ्या व आनंदाला ती मुकते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना क्वचितच सुट्या मिळतात त्यामुळे जीवनाला एक प्रकारचा यांत्रिकीपणा प्राप्त होतो. यातूनच मानसिक स्वास्थ्य बिघडते व विकृतीचा जन्म होत असतो.

प्रश्नांची उत्तरे आपल्याच हाती
या सर्व प्रश्नांची नोंद करावी तेवढी थोडीच होईल, कारण एकाप्रश्नातून दुसऱ्याचा जन्म होत असतो. यातील बरेचसे प्रश्न सोडविणे आपल्याच हातात आहे. सकस आहार व पुरेशी विश्रांती यामुळे शरीर सद्रुढ राहून अधिकाधिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची कुवत येते. प्रपंच व नोकरी यात समन्वय साधण्यासाठी पती पत्नी दोघांनी मिळून प्रपंचाचा गाडा चालविला पाहिजे. घरकाम हे फक्त स्त्रियांसाठीच असते, असे म्हणून चालणार नाही. घरातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळली तरी स्त्रियांवरील कामाचा तान बराच कमी होईल व घरात खेळीमिळीचे वातावरण पण राहील.