सुभेदार आणि त्याचा घोडा

एका सुभेदाराचा घोडा फार देखणा आणि चपळ होता; पण त्यापेक्षां दुसरा एक कमी प्रतीचा घोडा त्याने विकत घेतला आणि त्याचे लाड करण्यात आणि त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवण्यातच आपला बहुतेक वेळ घालवू लागला. एके दिवशी हा दुसरा घोडा पहिल्या घोडयास म्हणाला, ‘दादा, तू इतका सुंदर, मजबूत आणि चपळ असता, तुजकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात आमच्या धन्यास इतका आनंद वाटतो, याचे कारण काय असावे बरे ?’ पहिला घोडा उत्तर करितो, ‘कोणतीही वस्तू नवी असली, म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व ती अंमळ जुनी झाली की तिजकडे दुर्लक्ष करून नव्या वस्तूच्या नादीं लागावयाचें, हा सर्वसाधारण मनुष्यस्वभाव आहे. हल्ली आपला धनी तुझे फार लाड करतो आहे, पण थोडयाच दिवसांत, मजप्रमाणे तूही त्यास अप्रिय होऊन, तुझ्या जागी नवा घोडा येईल, याबद्दल तुझी खात्री असू दे. ’

तात्पर्य:- ‘वस्तू वाटे नवी जो अवड बहु तिची लोकरीती अशी हे. ’