Tag Archives: अहंकार

गणपतीला दुर्वा आवडतात

गणपतीला दुर्वा आवडतात

गणपतीला दुर्वा आवडतात

मित्रांनो! गणपतीला दुर्वा का प्रिय झाल्या हे आपण मागील कथेत पाहिले. परंतु दुर्वा गणपतीच्या आवडत्या होण्याची आणखी एक कथा आहे.

ब्रह्मदेवाने चराचर सृष्टीची निर्मिती केली. मग या सृष्टीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय करावी. असा प्रश्न त्याला पडला. तेव्हा त्याने श्रीगणेशाची आराधना सुरू केली. श्रीगणेशाचे ध्यान करीत असता त्याच्याच्या शरीरातून अनेक हातपाय, पुष्कळ तोंडे आणि खूप डोळे असलेली एक सुंदर देवी निर्माण झाली. ही देवीच सर्वांचे पोषण करील असे ब्रह्मदेवाला ज्ञान झाले. तेव्हा त्याने तिला आशिर्वाद दिला. ‘तू तप कर आणि श्रीगणेशाला प्रसन्न करून सर्वांचे अन्न हो. तुला दुर्वा हे नाव मिळेल.’ या देवीने मग श्रीगणेशाला आपल्या तपाने प्रसन्न करून घेतले. तेव्हा तिच्या मस्तकातून षडरसयुक्त स्वर्गान्न निर्माण झाले. पोटातून पृथ्वीवरच्या सजींवासाठी सुरस अन्न निर्माण झाले. पाताळातील लोकांसाठी तिच्या पायांपासून अन्न निर्मिती झाली. अशा तऱ्हेने तिन्ही लोकांतील चराचर सृष्टीस अन्नप्राप्ती होऊन तिन्ही लोक पुष्ट झाले. आणि या चराचरसृष्टीचा अनेक ब्रह्मदेवाला आनंद झाला. प्रसन्न होऊन त्याने तिला अन्नाची अधिष्ठात्री केले.

काही काळ लोटल्यावर या दुर्वा देवीला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. ती जगदंबा पार्वतीशीच स्पर्धा करू लागली. ती उन्मत्तपणे तिन्ही लोकांत ‘अन्नपूर्ण ’ मीच आहे. कारण मी अन्नस्वरुप आहे. ही जगदंबा अन्नपूर्णा नव्हे.’ असे म्हणत साक्षात जगन्माता अन्नपूर्णेची निंदा करीत फिरु लागली. पार्वतीला ही निंदा असह्य झाली. तिने दुर्वेचा गर्व उतरला. तिने पुन्हा तपश्चर्या केली. गणपतीची आराधना करु लागली आणि पार्वतीच्या शापापासून आपली मुक्ती करा अशी श्रीगणेशाजवळ प्रार्थना केली. श्रीगणेशांनी मग प्रसन्न होऊन तिला वर दिला. ‘अंशरुपाने तु पृथ्वीवर तृण होऊन राहशील. तृणरुप झालीस तरीही तेथे अमृतरुप धारण करून सर्वत्र पूज्य आणि मंगलदायिनी होशील. तुझ्या पत्राशिवाय माझी पुजा पूर्ण होणार नाही. तुझे पत्र मला आवडते असेल.’

तेव्हापासून दुर्वा गणपतीला आवडू लागल्या. गणपतीपूजन दुर्वांना अग्रस्थान लाभलं.

या कथेतून आपल्याला मिळणारा संदेश मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून कधीही आपल्या गुणांबद्दल गर्व करु नका.