Tag Archives: उंदीर

गणपतीचे वाहन उंदीर झाला

गणपतीचे वाहन उंदीर

गणपतीचे वाहन उंदीर

मुलांनो, गणपतीच्या पायांजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतोच. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविल्यावर उंदरासाठी करंजी द्यावी लागते. गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. तर गणपतीला उंदीर हे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल? याचीच ही कथा.

एकदा इंद्रसभेत समारंभात गाणे गाण्यासाठी इंद्राने क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीचे बोलावणे केले. तेव्हा घाईघाईन इंद्रसभेत येत असता या क्रौंच गंधर्वाची लाथ तेथेच बसलेल्या बामदेव नावाच्या महर्षीला बसली त्यामुळे बामदेव अतिशय संतापले. त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला, ‘तू तुरुतुरु पळणारा उंदीर होशील.’ त्याच्या शापने क्रौंचाचे उंदरात परिवर्तन झाले आणि तो उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.

या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करण्यास सुरूवात सुरुवात केली. आश्रमतले पदार्थ खाऊन त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. एवढेच नाही तर आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले. आश्रमातील साऱ्या शिष्यगणांनी या उंदरास पकडण्यासाठी जंगजंग पछाडले. पण छे! कोणाच्याच श्रमांना यश येत नव्हते.

शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव.’

गणपतीने मग तेथे प्रकट होऊन युक्तीने आपल्या पाश त्या उंदरावर टाकला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. पण उंदराचा उन्मत्त्पणा अजूनही ओसरला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘तुझ्याकडून मला कोणताही वर नको. तूच माझ्याकडे वर माग.’ त्याचा हा उद्धामपणा पाहून गणपती लगेच म्हणाले, ‘बरं, आजपासून तू माझे वाहन हो.’ आणि गणपती त्याचवेळी त्या उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदीर दीन झाला आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला.