Tag Archives: ऊस

बालहट्ट

एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, ‘बिरबल ! तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला आज दरबारात यायला उशीर का झाला ?’

बिरबल म्हणाला, ‘काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.’

‘बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे; तुझ्याकडे नोकरचाकर आहेत; तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला, तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं, आणि तू पटकन इकडे निघून यायचं.’

बिरबल म्हणाला, ‘ जहॉंपन्हा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना ? आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना ? मग आपण असं करु या; आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरुन बसतो. मी धरुन बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही. नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फ़ायदा उठवाल. आहे कबूल ?’

‘हात्तिच्या ! एवढंच ना ? होऊन जाऊ दे.’ बादशहा बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात-पाय झाडीत व रडत म्हणाला ‘आम्हाला ऊस हवा जा ऽ ऽ !’

बादशहा – (सेवकाकडे बघून) अरे बझारसिंग ! माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ? (ऊस येताच) हा बघ आणला ऊस. तो घे आणि चूप रहा.

बिरबल – ( रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत) आम्हाला ऊस असा नको जा ऽऽऽ! त्याचे खंड खंड करुन हवेत.

बादशहा – ( दुसऱ्या सेवकास) अरे खंडोजी ! सुरा आणून, तू माझ्य चिमूरड्याला या उसाचे खंड खंड करुन दे पाहू ? (सेवकाने तसे करताच) हे बघ दिले तुकडे तुकडे करुन. कर आवाज बंद. काय रे ? आता का उगाच केकाटतोस ?

बिरबल – (आवाज पूर्वीपेक्षा चढवून) आता आम्हाला अखंड ऊस हवा जा ऽऽऽ! असे तुकडे तुकडे केलेला नको !

बादशहा – (सेवकास) अरे ऊसखॉं ! माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू ? ( दिला जाताच) आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस ? मग आता का बोंबलतोस ?

बिरबल -(रडण्याचा सूर टिपेला नेत) आम्हाला नवा अखंड ऊस नको जा ऽऽऽ ! खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करुन हवा. ऑं ! ऑं ! ऑं

बादशहा – (भडकून) आता मात्र रडलास, तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढीन.

बिरबल – (एकदम ठाकठीक बसून) खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा, असं ठरलं होत ना ? मग आता माराची धमकी का देता ?

बादशहा – नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर; पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस.’ बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते,’ हे तुझं म्हणणं मी मान्य केलं; मग तर झालं?’