Tag Archives: कावीळ

आर. एच. निगेटिव्ह रक्तगट स्त्रि

गर्भारपणात डॉक्टरांनी रक्तगटाची तपासणी करायला सांगितली की बहुतेक स्त्रिया “ हे कशासाठी ?” अस चेहरा करून थोड्याबहुत घाबरलेल्या दिसतात. पण खरं म्हणजे त्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं. याउलट पुढे बाळंतपणानंतर जन्मजात बालकाला पहिल्याच दिवशी कावीळ झाली तर या तपासणीचा खरा उपयोग तिथं दिसून येतो. रक्ताची वर्गवारी करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. आर. एच. फॅक्टर नावाचा रक्तगटातील, ‘अँटिजीन रायसस’ माकडांच्या तांबड्या पेशीत आढळून येतो. ज्या लोकांच्या पेशीत हे अँटिजीन असेल त्यांचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह व वयांच्या पेशीत हे अँटिजीन असेल त्यांचा रक्तगट आर. एच. व ज्यांच्या पेशीत हे अँटिजीन नसेल त्यांचा रक्तगट आर. एच. निगेटिव्ह असतो. ह्या अँटिजीनचे प्रमाण ४३ टक्के गोऱ्या लोकात तर ९३ ते ९५ टक्के हिंदुस्थानी लोकांमध्ये आढळते.
अशा आर. एच. निगेटिव्ह व्यक्तींमध्ये या नसणाऱ्या अँटिजीन विरुद्धची अँटीबॉडी ( प्रतिकारात्मक ) तयार करण्याची ताकद असते. सामान्यतः अशा अँटिबॉडीज निर्माण होण्याची शक्यता आर. एच. पॉझिटिव्ह रक्तपेशी त्यांच्या शरीरात गेल्यास असते. अशी शक्यता –
(१) आर. एच. पॉझिटिव्ह रक्त, आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात भरलं तर.
(२) गर्भारपण यामुळे निर्माण होते.

गर्भारपण व अँटीबॉडीज
आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रीनं आर. एच. पॉझिटिव्ह बालकाल जन्म देणं हे पतीच्या रक्तगटावर अवलंबून असतं. वाढणारा गर्भ जर आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर विशेष करून बाळंतपणाच्या आधी काही दिवस बाळंतपणात व वार सुटताना आअ. एच. पॉझिटिव्ह रक्तपेशी आईच्या शरीरात जातात. अशावेळी स्त्रीच्या शरीरात त्या आर. एच. पॉझिटिव्ह अँटिनीन विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. पुढील गर्भारपणात या अँटीबॉडीज वारेच्या मार्गाने वाढणाऱ्या बालकाच्या रक्तात मिसळतात. त्यामुळे वाढणाऱ्या बाळाच्या तांबड्या रक्तपेशी मरून जातात. अशा तऱ्हेने बाळाच्या शरीरातील रक्ताचे प्रमान घटत जातं, त्याला अ‍ॅनिमिया होतो. त्याच बरोबर रक्तपेशीत बिलीरुबीन नावाचा रक्तघटक तयार होतो. या बिलीरुबीन नावाचा रक्तघटक तयार होतो. या बिलीरुबीनमुळेच बाळाला कावीळ होतो.

वाढणाऱ्या बाळाचा रक्तगट
आर. एच. निगेटिव्ह गटाच्या मातेमध्ये बाळाचा रक्तगट कोणता हे सर्वस्वी पित्याच्या रक्तगटावर अवलंबून असतं. त्यात पतीचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह होमोझायगस असेल तर सर्व मुलांचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह निर्माण होईल. पतीचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह हेट्रोझायगस असेल तर अर्धी अपत्ये आर. एच. पॉझिटिव्ह व अर्धी आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेली जन्मात येतील. परंतु पतीचा रक्तगट जर आर. एच. निगेटिव्ह असेल तर सर्वच मुले आर. एच. निगेटिव्ह जन्मास येतील व हा प्रश्नच उद्भवणार नाही.

आर. एच. पॉझिटिव्ह अँटिबॉडीजचा वाढणाऱ्या बालकावर परिणाम
(१) अ‍ॅनिमिया : नुसताच अ‍ॅनिमिया होणं म्हणजे अँटीबॉडीजमुळे सर्वात कमी त्रास होणं. यामध्ये जन्मतःच रक्त कमी असतं तसंच जन्मानंतर रक्त कमी होत जातं. त्यामुळे जन्मतःच बालक पांढरट दिसतं किंवा नंतर पांढरेपणा वाढत जातो. जर अ‍ॅनिमिया खूपच जास्त असेल तर बालकाला रक्त द्यावं लागतं.
(२) नवजात बालकास होणारी कावीळ : ही कावीळ जन्मानंतर १२ ते १४ तासांमध्ये वाढते. याचं कारणही तांबड्या रक्तपेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश हे होय. या रक्तपेशींपासून बिलीरूबीन नावाचा पदार्थ निर्माण होतो. बालकाचं यकृत, अशा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं बिलीरूबीन शरीराबाहेर टाकण्यास असमर्थ ठरतं. ही व्याधी जर कालांतराने वाढत गेली तर रक्तातील वाढलेल्या बिलीरूबीनचा परिणाम मेंदूवर होतो. व्याधीची तीव्रता जास्त असेल तर बालक मृत्यूमुखी पडू शकतं.
(३) हायड्राप्स फिटेलिस : यात बालकाच्या शरीरात असणाऱ्या तांबड्या रक्तपेशींच्या मृत्यूचे प्रमाण खूपच असल्यामुळे बालकास खूपच अ‍ॅनिमिया होतो. त्याचबरोबर प्राणवायूचा पुरवठा मेंदू, हृदय व इत्र अवयवांना नीट होत नाही; त्यामुळे सर्व पेशींना सूज येते. त्याबरोबर पोटात फुप्फुसांच्या आवरणात पाणी साठते. अशी व्याधी झालेल्या बालकांच्या मातेच्या गर्भाभोवतीचं पाणी खूपच निर्माण होतं. म्हणून पोटाचा आकारही मोठा असतो. असं बालक मृत जन्मास येतं किंवा जन्मल्यानंतर फारच थोडा वेळ जगू शकतं.

गर्भारपणातल्या तपासण्या
(१) दिवस गेलेल्या स्त्रीच्या रक्ताच्या गट तपासणं, तसंच तिच्या पतीचा रक्तगट तपासणं.
(२) पत्नी आर.एच. निगेटिव्ह गटाची असेल आणि पती आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर गर्भारपणाच्या २७ आठवड्यानंतर पत्नीच्या रक्ताची तपासणी अँटीबॉडीजसाठी करणं आवश्यक ठरतं. जर अँटीबॉडीजचए प्रमाण ५/२५० पेक्षा जास्त असेल तर त्यांचा गर्भावर परिणाम होण्याची शक्यता असते. अश तऱ्हेच्या तपासणीला “ इनडायरेक्ट कुंब्ज” तपासणी म्हणतात. ही तपासणी २६ आठवड्यांनंतर वरचेवर करावी लागते.
(३) कुंब्ज टेस्टपेक्षा जास्त माहिती मिळविण्यासाठी गर्भोदकाची तपासणी करतात व त्यात असणाऱ्या बिलीरूबीनच प्रमाण ठरवतात. ही तपासणी स्पेक्टो फोटोमिटरनी केल्यास जास्त अचूक माहिती मिळते.

अँटीबॉडीज तयार होऊ नयेत म्हणून उपाय
(१)  Rh-ve  व्यक्तीस  Rh +ve  देऊ नये.
(२) अँटी-डी-इंजेक्शन : प्रत्येक आर. एच. निगेटिव्ह  गर्भारपणात कालजी घ्यावी. बाळंतपणानंतर, अ‍ॅबॉर्शननंतर “अँटी. डी.” नावाचे इंजेक्शन स्त्री द्यावे. या इंजेक्शनमुळे अँटी बॉडीज निर्माण होत नाहीत.हे इंजेक्शन बाळंतपणानंतर किंवा अ‍ॅबॉर्शननंतर शक्य तो लवकर द्यावे. ( साधारपणे ४२ ते ७२ तासांचे आत ) या इंजेक्शनची किंमत सध्या बाजारात खूप असली तरी त्याचा उपयोग खूपच आहे.

अँटीबॉडीज तयार झाल्या नसतील तर ?
स्त्रीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील. तरीसुद्धा विज्ञानाच्या शोधामुळे या रोगाची व्याप्ती कमी करता येते.
(१) गर्भारपणात बालकास रक्त भरणे ?
वरचेवर तपासण्यानंतर वाढणाऱ्या गर्भास धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आढळते तर, हा उपय ८ ते ८॥ महिन्यांआधी करतात. यामध्ये मातेच्या पोटातून बाळाच्या पोटात एक नलिका घालून त्यातून रक्त भरलं जात. जर व्याधीचं प्रमाण अधिक असेल तर, रक्त वरचेवर भरावं लागतं.
(२) बाळंतपण तारखेच्या आधीच घडवून आणणे :
गर्भारपणाच्या वाढणाऱ्या दिवसाबरोबर धोकाही वाढत असतो. तारखेच्या आधी बाळंतपण केल्यास बाळास कावीळीचा धोका कमी होतो. म्हणून ३४ ते ३८ आठवड्यात बाळंतपण घडवून आणलं जातं. यासाठी कळा येण्याची इंजेक्शनस किली जातात.
(३) बाळ जन्मानंतरच्या तपासण्या :
(१) बाळाचा रक्तगट
(२) बाळाजी कुंब्ज टेस्ट.
(३) रक्तातील बिलीरूबीनचे प्रमाण
(४) शरीरातील रक्ताचं प्रमाण .
जर बाळाच्या रक्ताचं प्रमाण खूपच कमी झालेलं असेल. बिलीरूबीन खूप असेल किंवा जन्मतःच कावीळ झालेली असेल व वाढत असेल तर लगेचच पुढील उपचार करावे.

(१) बाळाचे रक्त बदलणे :
यामध्ये प्रथम थोडे पूर्वीचे रक्त काढून टाकून नवीन रक्त भरलं जातं. अशा तऱ्हेने शरीरातील बरचसं रक्त बदललं जातं.
(अ) शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
(ब) बिलीरूबीनचे प्रमाण कमी होते.
(क) अंगात रोग प्रतिकारक शक्ती येते.
(ड) शरीरातील अल्यूमीनचे प्रमाण वाढल्यामुळे सूज कमी होते.

(२) ब्लू लाईट देणे :
यामुळे काविळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व पुढील संभाव्य धोका टाळता येतो.
विज्ञानात होणाऱ्या सुधारणेमुळे पूर्वीइतका , आर. एच. निगेटिव्ह स्त्रीचे गर्भारपन व बाळंतपण हा प्रश्न बिकट राहिला नाही. तरीसुद्धा योग्य कालजी घेणे जरूर असतं; कारण थोड्या निष्काळजीपणामुळे धोका होण्याचा संभव असतो. तो टाळण्यासाठी डॉक्टर सल्ल्याप्रमाणं वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचं ठरतं. सध्यातरी आर.एच. निगेटीव्ह मातेला मूल होणं “ही श्रीमंती आवड आहे.” एवढे मात्र खरं !