Tag Archives: काशी

काशीतील धुंडिराज गणेश

पूर्वी कश्यपऋषींनी विष्णूच्या आज्ञेने आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने चार प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. नंतर दीन, दुबळ्या व पंगू लोकांच्या उद्धारासाठी ऋषींनी आणि देवांनी अनेक तीर्थे निर्माण केली आणि अशा प्राण्यांना तात्काळ मुक्ती मिळण्याकरिता वाराणसी क्षेत्र शंकराने स्थापिले. प्रलयकाळी या वारणसीचे रक्षण करण्यासाठी शंकर तिला आपल्या त्रिशुळावर धारण करतात. काशीक्षेत्र हे हिंदूचे सर्वात प्रिय क्षेत्र काशीस जावे । नित्य वदावे ॥ मनापासून अशी इच्छा असली, तर ती यात्रा कधीतरी घडतेच.

महादेवांनी भस्मासूर राक्षसाला विष्णूकडून मोहिनीरुपाने ठार केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी भस्मासुराचा मुलगा दुरासद याने कठोर तपश्चर्या केली. तेव्हा शंकराची प्रसन्न होऊन त्यास ‘एका शक्तीवाचून तुला मारण्यास कोणीच समर्थ होणार नाही.’ असा वर दिला.
शंकराच्या वराने मत्त झालेल्या दुरासद राक्षसाने त्रिभुवनात हाहाःकार माजवला. सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर काशीक्षेत्र जिंकून घेण्यासाठी तो विमानाने काशीत आला. काशीतील देवपूजा, व्रते, नित्यकर्मे त्याने बंद करविली. जिकडे तिकडे अधर्म पसरला.

तेव्हा सर्व देव शंकर-पार्वतीस शरण गेले. तेव्हा पार्वतीच्या नेत्रांमधून एक अलौकिक तेज बाहेर पडले. त्या तेजामधून वस्त्रालंकार व दोन दातांसह शुंडदंडाने निराजमान अशी विनायकाची मूर्ती प्रगट झाली. देवांनी या विनायकाचे नाव ‘वक्रतुंड’ असे ठेवले.

देवांना धीर देऊन तो ‘वक्रतुंड विनायक’ सिंहावर आरुढ झाला व दुरासद दैत्याशी युद्ध करु लागला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. गजाननाने आपले विराट स्वरुप प्रकट केले आणि त्या राक्षसाची शेंडी धरली, नंतर एक पाय काशी नगरामध्ये आणि दुसरा त्या राक्षसाच्या मस्तकावर ठेवून गजानन त्याला म्हणाले, ‘अरे दुष्टा, महादेवांच्या वरदानामुळे तुला मृत्यू येणार नाही, हे मला माहीत आहे. यासाठी तू पर्वताचे रुप धारण करुन या नगरीसमीप स्तब्ध पडून रहा व या नगरीचे रक्षण कर.’ हे ऐकून तो दैत्य आनंदाने म्हणाला, ‘गजानना, तू जर आपला पाय सदोदित माझ्या मस्तकावर ठेवून असाच काशीसमीप उभा राहशील तर मी येथून कुठेही जाणार नाही.’ गजाननाने राक्षसाचे हे बोलणे मान्य केले. अद्यापि गजानन वास करीत आहे.

गजाननाने दुरासदाचा वध केल्यावर देवांनी त्याची स्तुती केली. ‘नित्यनेमाने तुझी पूजा करणारे, तुझाच शोध करीत असतात. ‘ढुंढि’ या शब्दाचा अर्थ ‘शोध करणे’ असा आहे. ‘ढुंढि’ या नावाने तू लोकांमध्ये प्रसिद्ध होशील. तुला लोक ‘ढुंढिराज’ असे म्हणतील. तुझे दर्शन, पूजा, ध्यान व स्मरण ही धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्धाची साधने होतील.’ अशा प्रकारे गजाननाची स्तुती करून देवांनी मंदारपुष्पांनी व शमीपत्रांनी विनायकाची पूजा केली.

सर्व लोकांनी मोठा समारंभ केला. काशीत ‘धुंडिराजाची’ स्थापना केली. त्याला धुंडिराज या नावानेच ओळखू लागले. त्याचं उत्तम मंदिर बांधले. काशीतील ‘धुंडिराज गणेश’ सर्वांची दुःख दूर करु लागला. लोक सुखासमाधानाने राहू लागले. धुंडाळण चुकवतो तो धुंडिराज.