Tag Archives: कुटुंबव्यवस्था

घराचे दायित्व

आपल्या घराच्या दर्शनी अंगाचा असा विचार करताना जाणवते की, तथाकथित सुधारलेल्या मंडळींनी हळूहळू पाश्चात्त्य पद्धतींचा स्वीकार केला आहे आणि आपली सांस्कृतिक प्रतीके व त्या प्रतीकांच्या उदात्त आशय त्यांच्या विस्मरणात जात आहे. परिवाराच्या आणि घरी येणाऱ्य स्नेही जनांच्या ठायी मांगल्याची भावना निर्माण करणाऱ्या अनेक पारंपारिक गोष्टींची उपेक्षा होत आहे. पण असे असले तरी बराच मोठा शहरी व विशेषतः ग्रामीण भागांतील समाज असा आहे की, ज्याने संस्कार जपले आहेत. ही माणसे कदाचित आर्थिकदृष्ट्या संपन्न नसतीलही, पण त्यांच्या ठायी संस्कारांची श्रीमंती अवश्य असते. साध्या झोपटीतही संस्कृतीचे दर्शन घडते. याचे श्रेय अर्थातच प्राधान्याने अत्यंत कष्टाळू, सोशिक आणि सश्रद्धा गृहिणीकडे जाते.

जीवनसंघर्ष उग्र झाला आहे, पण त्यासाठी लागणारे बळ ‘ ईश्वरनिष्ठा ’ जीवनातून सहजपणे संपादन करण्याचे वळण या मंडळींच्या जीवनाला मिळालेले असते. या घरांत आपल्याला अद्यापही सडासंमार्जन दिसेल, रांगोळ्या दिसतील, देवदेवतांच्या तसबिरी दिसतील, पारंपारिक पद्धतीचे सणवार दिसतील, स्वदेशी वेशभूषा दिसेल, आंतरिक समाधानासाठी भौतिक सुखांच्या त्यागाचेही दर्शन घडू शकेल. सध्या शहरे विस्तारत आहेत व शहरांच्या छायेत ग्रामीण भाग वाढत्या प्रमाणात येऊ लागला आहे. दूरदर्शनचे उपभोगांचा हव्यास वाढविणारे जाळे देशाच्या अंतर्भागांत दूरवर पोचत आहे. अशा संक्रमण काळात संस्कारांचे सातत्य टिकवून ठेवणे, घरांचे हिंहू स्वरूप कायम राखणे हे एक मोठे आव्हानच आहे. उदात्त संस्कार घेण्याचे, देण्याचे, दृढ करण्याचे आणि त्यांचे सातत्य कायम राखण्याचे कार्य गृहसंस्थेलाच प्राधान्याने करावे लागते. याचे विस्मरण होऊन चालणार नाही. या द्रुष्टीने विचार केल्यास आज देखील ग्रामीण भागातील घरे हीक मोठे आशास्थान वाटते. या घरांचा योगक्षेम, आरोग्य, शिक्षण व त्यांचे ताणतणाव यांची चिंता वाहण्याची जबाबदारी असलेल्या व्यवस्था मात्र राजकारण, सत्तास्पर्धा, भ्रष्टाचार व कर्तव्यविन्मुखता यापायी सर्वस्वी अकार्यक्षम बनत आहेत. ही मोठी चिंतेची बाब आहे.

घराच्या केवळ बहिरंगाचा विचार आतापर्यंत आपण केला. त्यात असे लक्षात येते की, आपल्या सांस्कृतिक दृष्टिकोनामुळे जड भासणाऱ्या गोष्टीही सजीव झाल्याप्रमाणे आपले स्वागत करीत आहेत. म्हणुन एका हिंदू घरातल्या व्यक्तींचे परस्परांशी व्यवहार, ज्या पायावर भारतीय संस्कृती चिरंजीव बनली आहे ती कुटुंबव्यवस्था, कुटुंब व समाज यांचे परस्परांशी संबंध, जी मूल्ये उन्नत जीवनासाठी आवश्यक मानली गेली, त्यांचे प्रत्यक्ष आचरण करण्याची पद्धती. त्यांतून घडणारे संस्कार, अत्युच्च संस्कारक्षमता जिची आहे त्या स्त्रीचे कुटुंबातील स्थान, सृष्टीतील इतर सजीवांशी होणारे वर्तन, निसर्गासंबंधीचा दृष्टिकोन, भौतिक व आध्यात्मिक विकासाची संकल्पना इत्यादी विविध दर्शने मानवाच्या दररोजच्या जीवनातील आचरणात साकार केली, तिने याही बाबतीत सखोल विचारांती काही पद्धती निश्चित केल्या आहेत.