Tag Archives: कृषि विभाग

महिलाशक्तीचा जागर

नांदेड-बसमत रस्त्याला लागून असलेल्या नांदेड तालुक्यातील बोंढार गावात गेल्यावर गावातील महिलांविषयी कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात. गावाच्या बाहेरील बाजूस असलेल्या आसना नदीपात्राकडे गेलं की या कौतुकामागचं कारण लक्षात येतं. नदीपात्रात ओळीने रचलेली पोती आणि त्यामागे साठलेला जलाशय पाहिल्यावर आणि महिलांनी हे भव्य कार्य केल्याचे ऐकून अभिनंदनाचे दोन शब्द नकळतपणे बाहेर पडतात. गावातील महिलाशक्तीने एकत्रित येऊन आसना नदीवर ४० मीटर लांबीचा जिल्ह्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा बांधला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्ह्यात वनराई बंधारा निर्मितीचा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात आला असून १४ हजार ५०० वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमात कृषि विभागाने उल्लेखनीय योगदान दिले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने साडे सहा हजार पेक्षा जास्त वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. जिल्ह्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून सुमारे पंधराशे बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात बोंढारच्या महिलांनी केलेले काम नजरेत भरण्यासारखे आहे.

बोंढार हे गाव फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावात विकासाला पूरक वातवरण असले तरी महिलावर्गाचा शेती अथवा इतर व्यवहारात फारसा सहभाग नव्हता. कृषिक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी कृषी सहायक यु.के, माने यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे गावातील महिला एकत्र आल्या. महिलांना फुलशेती आणि हळद पिकाची माहिती देण्यासाठी त्यांनी कृषि विभागामार्फत राज्यात महिलांचे १४ दौरे काढले. त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी विश्वासाची भावना महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तीव्र पाणी टंचाई होती. गतवर्षी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी वनराई बंधारे उभारण्यासाठी विशेष अभियानास सुरुवात केली. त्यास प्रतिसाद म्हणून बोंढरच्या ग्रामस्थांनी वनराई बंधार उभारला. मात्र यावर्षी पुरुष वर्गाने फारसा उत्साह दाखविला नाही. सुदैवाने पर्जन्यमान चांगले झाल्याने नदीला बऱ्यापैकी पाणी होते. गरज होती ती बंधारा तयार करण्याची अशातच परभणी येथे कृषी प्रदर्शन पाहण्यास गेलेल्या १५ महिल्यांसमोर माने यांनी वनराई बंधारा बांधण्याची कल्पना मांडली. गावातील पुरूष यावर्षी पुढाकार घेत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर महिला या कामासाठी तयार झाल्या. बैठकांच्या माध्यमातून माने यांनी पाणी बचतीचे फायदे व त्याचे नियोजन याबाबतची माहिती महिलांना दिली. ‘गावात बंधारा होणारच’ हा निश्चयाचा सुर बैठकीत उमटला. गावातील आपल्या सहकार्याचा एकत्रित करण्याचे जबाबदारी महिलांनीच उचलली. गावातील महिलाशक्ती एकत्र आली आणि वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीला सुरूवात झाली. महिलांना एकत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या शंकुतला आरसुळे बंधाऱ्याच्या निर्मितीबाबत भरभरून बोलतात, ‘आम्ही स्वतःच्या शेतातही कधी काम करायला गेलो नाही. पण गावाचं भलं होतं आहे म्हटल्यावर घराची चौकट ओलांडतांना आम्हाला काहीच वाटलं नाही’ असं सांगतांना गावातील महिलादेखिल श्रमाच्या बाबतीत मागे राहणाऱ्या नाही हे बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे सिद्ध झाल्याबद्दल त्या समाधान व्यक्त करतात. सुरुवातीला महिलांना एकत्रित कामाला जातांना पाहून कामाबद्दल शंका उपस्थित करणाऱ्याकडून कौतुक होतांना पाहून या महिलांच्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटलं.

गावाच्या बाहेरील बाजूस आसवा नदीपात्रात काम सुरू करण्यात आले. याच सुमारास कापूस वेचणीचा मोसम होता. ‘कापसाचं काय, गावाला पानी भेटायला नको का? आमी समदे येनार’ महिलांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्व महिला एकजूटीने कामाला लागल्या. सतत ५ दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम करीत होत्या. प्रशासनाकडून महिलांना रिकामे पोते उपलब्ध करून देण्यात आले.

सात हजार पोत्यांचा उपयोग बंधाऱ्यासाठी करण्यात आला. पोत्याचे गठ्ठे करणे, माती भरणे, पोते रचणे अशी विविध कामे महिलांनी गटागटाने नियोजनबद्ध पद्धतीने केली. त्यातून ४० मीटर रूंद व दीड मीटर उंचीचा भव्य बंधारा साकारला. या बंधाऱ्यामुळे २३.५० टीएमसी पाणी थांबले. याचा फायदा बोंढार (वेरली) गावाबरोबरच भालकी, चिमेगाव, चिखली (बु) आणि काही प्रमाणात कासारखेडा परिसरालासुद्धा झाला आहे. नदीवर २० विहिरी असून त्या पूर्णतः भरल्या आहेत. गावाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. बंधाऱ्याच्या निर्मितीत सहभाग आलेल्या केरुबाई वड्डे यांचे पती कॅन्सरने आजारी होते. बंधाऱ्याच्या कामासाठी पती आजारी असतांनादेखिल त्यांनी एक दिवस श्रमदान केले. पती सिरीयस झाल्याने घरी पाहुण्यांची गर्दी वाढू लागली. केरुबाईंची महिलांचे संघटन करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांचे अर्धे लक्ष बंधारा निर्मितीकडे होते. शेवटी महिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी राहण्यास सांगितले. आजही केरुबाईना भेटल्यावर बंधाऱ्याच्या कामात शेवटपर्यंत सहभाग न घेवू शकल्याबद्दलची खंत व्यक्त करतात.

पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी बंधाऱ्याला भेट देवून महिलांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. गावाच्या विकासासाठी महिलाशक्ती पुढे सरसावल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रोत्साहन म्हणून त्यांनी गावात सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनीदेखील बंधाऱ्याला भेट देवून महिलांची केलेल्या कार्याचा गौरव केला. कृषी सहायक माने यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. बंधाऱ्यामुळे अडविलेल्या पाण्याचा फायदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, फुलशेती, ऊस, केळी, भाजीपाला आदी पिकांसाठी होत आहे. जनावरांना पिण्यासाठी तसेच महिलांना धुणी धुण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग होत आहे. बंधाऱ्यावर ५० पेक्षा अधिक मोटारीने पाणी उपसा होत असून त्यावर १०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायती झाली आहे. बंधाऱ्यामुळे शेतकरी समाधानी झाले असून महिलांनी केलेले हे कार्य जिल्ह्यातील जलसंधारण चळवळीसाठी आदर्श ठरले आहे. शिवाय या कामाचे विविध पातळीवरून कौतुक झाल्याने महिलांचा आत्मविश्वासदेखील वाढला आहे. या महिला गावाच्या विकासात अधिक क्रियाशील भूमिका निभावण्यासाठी पुढे येत आहेत.