Tag Archives: कॅल्शियम

घरगुती अपघात

दुपारी २.३० चा सुमार. बिल्डिंगमध्ये नीरव शांतता पसरली होती. नोकरदार मंडळी आपपल्या कामावर गेलेली. चिल्लीपिल्ली शाळेत अडकलेली ! काही खोल्यात उरलेल्या गृहिणी जेवणखाण आटोपून वामकुशीच्या तयारीला लागलेल्या होत्या. कंपनीची बस गाठायला सेकंड शिफ्टवाला सुरेश गडबडीने निघाला होता. घाईघाईत कुलूप लावताना किल्ली उलटी लागली. धडपड धडपड करून, अखेर कुलूप लावून वळला मात्र आणि त्याला शेजारच्या खोलीतून अस्पष्ट कण्हणं ऐकू आलं! वास्तविक सून, मुलगा कामावर गेल्यानंतर यशोदाकाकू साऱ्या बिल्डिंगची राऊंड घेऊन इतरांच्या भल्याची काळजी करत तासभर तरी हिंडायच्या. आज आंघोळीच्या वेळी बाहेर काकूचं प्रवचन झडलं नाही; तेव्हाच सुरेशला चुकल्याचुकल्यासारखं झालं. पुढे जाऊन पाहातो, तो दाराला आतून कडी ! शेवटी व्हॅटिलेटरमधून उडी मारून तो धावतच आत गेला. यशोदाकाकू बाथरूममध्ये अस्ताव्यस्त पडल्या होत्या. डावा पाय बाहेर वळून जमिनीला घासत होत्या. वेदनांनी त्यांचा चेहरा विस्कटून गेला होता आणि दबल्या आवाजात त्यांचं विव्हळणं चालू होतं. त्यानं काकूंच्या पायाला हात लावला मात्र आणि एक किंकाळी फोडून त्या बेशुद्ध पडल्या.

हे दृश्य परवा परवाच तुमच्या शेजारी पाहिल्यासारखे वाटतंयनं ? सध्याच्या काळात आपल्या सर्वांच्या आयुष्यातला हा अगदी नित्याचाच प्रसंग होऊन बसला आहे.वाढत्या औद्योगिकरणाबरोबर कारखान्यातील अपघात आणि वाढत्या रहदारीबरोबर रस्त्यावरील अपघात यांच्याबरोबरच घरातल्या अपघातंचे प्रमाणही वाढल्याचं आपल्याला आढळून येईल. शहरात झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण आणि त्यामुळे घरापासून बागेपर्यंत झालेली गर्दी आणि या घरगुती यांत्रिक उपकरणांचा ( वृद्धांच्या किरकोळ अपघातांचीसुद्धा दखल घेणं अत्यंत आवश्यक असतं ) वाढता उपयोग हे बरेचसे या अपघातांना कारणीभूत आहेत.

या अपघातांमधून पाळण्यातल्या मुलांपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत कोणाचीही सुटका नाही. परंतु अर्थातच सतत धडपड धडपड करणारी मुलं आणि सावकाश हालचाली करणारी वृद्धमंडळी हीच जास्त करून या अपघातांना बळी पडतात.योग्य खबरदारी घेतल्यास बरेचसे अपघात टाळण्यासारखे असताट. परंतु एकदा अपघात झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळेपर्यंत सर्वसामान्य माणसालाच या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असल्यामुळे, त्याला प्राथमिक उपचारांची ओळख असण्याची आवश्यकता आहे. जखमांच्या आणि फ्रॅक्चर्सच्या भवितव्याच्या दृष्टीनेसुद्धा योग्य प्राथमिक उपचार मोलाचे ठरतात.घरामध्ये होणाऱ्या अपघातांच्या वेळी मदतीला कोणी उपस्थित असेलच याची खात्री देता येत नाही. लहान मुले अथवा वृद्ध या अपघातात सापडल्यास गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतो. अशावेळी प्रसंगावधान राखून धीर न सोडता योग्य त्या हालचाली करणं अतिशय महत्त्वाचं असतं.

शाळेच्या वयातील मुलांचे उपद्व्याप अक्षरशः अनंत असतात. अम्हिन्याभरात धडपडला नाही असा एकही मुलगा नसेल. कधी दारात अथवा खिडकीत बोट चेमटून घेतील, तर कधी पलंगावरून टेबलावरून, माळ्यावरून किंवा बाल्कनीतूनही खाली पडतील. पतंगाच्या नादात गच्चीतून तोल जाऊन पडणारी आणि रस्त्यावर वाहनांखाली चेंगरणारी मुलं गल्लीगल्ली असतात. आईचा डोळा चुकवून स्वयंपाकघरातल्या चाकू, सुरी, विळी, खोबरं-किसणी इत्यादींवर ही वीर मंडळी उलाढाल्यावरून हात पाय कापून घेतात. इतर मुलांबरोबर म्रामाऱ्या तर रोजच्या चालू असतात. एकमेकांचे पाय ओढणे, चाट घालून पाडणं, ढकलणंअ दुसऱ्याचं डोकं आपटणे, निरनिराळ्या वस्तू एकमेकांच्या अंगावर टाकणं, चावणं अशा असंख्य प्रकारात मुलं आपल्याला इजा करून घेत असतात. उंबऱ्यात अडखळून पडणं, दारात लोंबकळून झोके घेताना तोल जाऊन पडणं, जिन्यातून घसरणं, यामधून शरीराला मोठ्याप्रमाणावर धोका पोहोचण्याचा संभाव असतो. पालकांच्या निष्काळजीपणामुळे स्टोव्ह, गॅस, शेगडी, कंदील अशा वस्तूंवर पडून अथवा कपडे पेटून अनेक मुले रोज भाजत असतात. सायकलच्या चाकात पायाची बोटे अडकून तुटणं सायकलवरून पडणं अशा गोष्टीही सारख्या चालू असतात.

अपघात कसे टाळावे ?
मोठ्या माणसाचं व्यवस्थित लक्ष असल्यास यातील बरेचसे अपघात टाळता येतात. मुलांच्या खेळकरपणाला बाधा न आणता त्यांना चालावं कसं, पळावं कसं वेगवेगळ्या गोष्टी हाताळाव्या कशा हे योग्य रीतीनं समजावून दिल्यास बरेच गंभीर प्रसंग टाळता येतील. चाकु, सुऱ्या इत्यादी धारदार वस्तू त्यांच्यापासून लांब ठेवाव्यात. विस्तवाच्या जवळपास त्यांना धांगडधिंगा करू देऊ नये. नवीन घरबांधणीमध्ये दारांना उंबरे नसल्यामुळं आणि खिडक्या दारे अडकविण्याची सोय असल्यामुळे, बोटं चेमटण्याचे प्रकार बरेच कमी झाले आहेत.आयोडीन, स्पिरिट, बेन्झॉईन आणि ड्रेसिंगचे इतर सामान प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे. अंगावर कुठं कापल्यास डॉक्टरकडं नेण्यापूर्वी जखम डेटॉल अथवा सॅव्हलॉनने स्वच्छ धुऊनं ती कोरड्या ड्रेसिंगनं ताबडतोब बंद करणं आवश्यक आहे. नुसते खरचटल्यास त्यावर पाणी, माती किंवा घरगुती लेप न लावता कापसावर बेन्झॉईन घेऊन जखम ताबडतोब बंद करावी, म्हणजे ती बरी होईपर्यंत उघडावीसुद्धा लागत नाही.लहान मुलांची हाडं कोवळी आणि लवचिक असल्याकारणानं पुष्कळवेळा ती मोडण्यापेक्षा नुसतीच वाकतात आणि अशा तऱ्हेने वाकलेले पाय, दंड अथवा हात पाहून पालकांना साहजिकच भीती वाटते, अशा वेळी नुसतीच मसाज करणं, हात चोळणं लेप अथवा हाडं बसवून देणाऱ्या वैदूला दाखवणं असे उपाय न करता हात एखाद्या स्वच्छ फडक्याने गळ्यात अडकवून ठेवावा. पाय एका टणक फळीला किंवा छत्रीला अथवा दोन बांबूच्यामध्ये फडक्याने बांधून ठेवावा. तज्ज्ञ डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेणेही अशा वेळी आवश्यक ठरते. या प्रकारचा वाक लवकरच भूल देऊन सरळ न केल्यास हातपायांच्या हालचालीत मोठेपणी बरीच कमतरता राहण्याची शक्यता असते.

बऱ्याचवेळा कोपराजवळची हाडे मोडतात. आणि खूप सूज येते. याचे महत्त्व खूप लोकांच्या लक्षात येत नाही, असं आढलून आलं आहे. सूज आली म्हणून किरकोळ लेप लावले जातात. एक दोन दिवसांतच कोपरांची हालचल बंद होते. मग होणारा उपाय म्हणजे चोळणं ! यानं तुटलेली हाडं आणखीनच सरकून संध्याचं जडत्व वाढते आणि कधी कधीकधी शेजारील रक्तवाहिनीलाही इजा होते. ह्या प्रकारचे फ्रॅक्चर मुलांमध्ये खरोखरच गंभीर असते. ते लवकरात लवकर योग्य जागी जुळवून प्लॅस्टरमध्ये बसविणे अतिशय आवश्यक आहे. या गोष्टीत दिरंगाई केल्यामुळं कोपर, हात व बोटे आखडून हातात व्यंग आलेलं नेहमी पाहण्यात येतं. त्यामुळंच मुलांच्या हातावर, कोपरावर, घोट्यावर अथवा पायावर आलेली सूज बिनमहत्त्वाची म्हणून दुर्लक्षित न करता लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलात तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय शरीराच्या कुठल्याही भागात सूज आल्यानंतर मसाज करणं अथवा चोळणं कटाक्षानं टाळावं.

योग्य प्राथमिक उपचार महत्त्वाचे
काही वेळा जखमेतून अतिशय रक्तस्त्राव होऊनमुलं बेशुद्ध पडतात, डोळे फिरवतात. पांढरी फटक पडतात. अशावेळी नुसतं डोक्यावर पाणी मारणं किंवा कांदा हुंगायला देणं पुरेसं नसतं. मुलाला प्रथम पलंगावर झोपवून त्याच्या पायाकडील भाग विटेवर अथवा लाकडी ठोकल्यावर उंच करावा. तोंड एका बाजूला फिरवावे आणि हनुवटी वर उचलावी. जखमेवर स्वच्छ फडके आणि कापूस यांचा दाब देऊन ती घट्ट पकडून धरावी. उपचाराची पूर्ण माहिती नस्ताना जखमेच्यावर रुमालाने अथवा दोरीने करकचून बांधणे टाळावे कारण रक्तस्त्राव नीलेमधून होत असल्यास, अशा बांधण्याने तो आणखीनच वाढतो. खूप उंचीवरून मूल खाली पडल्यास मेंदूल जबरदस्त मार बसतो. मूल बेशूद्ध होणं, त्याला उलट्या होणं नाकातून अथवा कानातून रक्त येणं, फीटस येणं ही मेंदूला मार लागल्याची गंभीर लक्षणं आहेत. अशा वेळी रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलामध्ये नेणं आवश्यक आहे.

वृद्धांना होणारे अपघात.
लहान मुलांची ही तऱ्हा तर आजी आजोबा मंडळीची वेगळीच. वयोमानाबरोबर हाडांमधील कॅल्शियम द्रव्य कमी होत असते. शरीराची हालचाल कमी होऊन जडत्व आलेले असते. काही वृद्धांचा आहारही बराचसा कमी झालेला असतो आणि त्यामुळं अत्यावश्यक जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण झालेला असतो. ह्या सर्वांमुळं म्हातारपणी हाडं अतिशय ठिसूळ होतात. किरकोळ मार किंवा हातपाय लचकणं असली कारणेसुद्धा ती मोडायला पुरेशी असतात. स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यानंतर हाडं ठिसूळ होण्याची क्रिया अधिकच झपाट्यानं होते. बऱ्याचशा वृद्धांना डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर संधिवात इत्यादींनी ग्रासलेले असते. त्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती, झीज भरून येण्याची शक्ती सर्वच कमी झालेले असते. किरकोळ अपघातानंतरही ते रुग्यशय्येला जास्त काळ खिळून राहात असल्यानं त्यांच्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळं जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. वाढत्या वयाबरोबर रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो. त्यातील लवचिक तंतू नाश पाहून त्याजागी कॅल्शियम आणि इतर द्रव्यं कडकपणा तयार करतात त्यामुळं एकदा कापल्या गेल्यानंतर रक्तवाहिन्या आकुंचन पाहू शकत नाहीत. म्हणूनच किरकोळ जखमेतील रक्तस्त्राव थांबवणेही कधी कधी अवघड जाते. यावरूनच आपल्या लक्षात येईल की वृद्धांना कितीही किरकोळ इजा झालेलीअसो त्याची योग्य त्या गांभीर्यानं तिकडीनं दखल घेणं अतिशय आवश्यक आहे.

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यावर खुब्याचं हाड मोडणे हा एक अतिशय रूढ अपघात आहे. किंबहुना काही डॉक्टर्स, ह्या फ्रॅक्चरला गंमतीने बाथरूम फ्रॅक्चर असेच म्हणतात. हाडे ठिसूळ मोडतात. पाण्यात अथवा केळीच्या सालीवर घसरून पडणे, गालीच्याच्या किंवा सतरंजीच्या टोकात पाय आडकून पडणे, दुसऱ्याचा धक्का लागून किंवा जिन्यात घसरून पडणं इतक्या किरकोळ गोष्टीही हे फ्रॅक्चर होण्यास पुरेशा अस्तात. प्रोस्टेट ग्रंथी वाढलेल्या वृद्ध लोकांना रात्री बरेच वेळा लघवीसाठी उठावे लागते. बहुतेक वेळा अंधारात चाचपडून अथवा बाथरूमची दिशा चुकून ते घसरून पडतात. पडल्यानंतर पुन्हा उठणे अशक्य होऊन खुब्यात आणि मांडीत असह्य वेदना होतात. पायाच्या कुठल्याही हालचालीबरोबर वेदनांचा अक्षरशः डोंब उसळतो. उठून बसता न येणं आणि इजा झालेला पाय बाहेरच्या बाजूल वळून जमिनीला टेकलेला असणं ह्या दोन गोष्टी दिसल्यास खुब्यातलं हाड मोडलेले आहे असे अनुमान काढण्यास हरकत नाही.रोगी स्वतः काही हालचाल करू शकत नसल्याने, आयत्यावेळी घरास अथवा शेजारी दुसरे कोणी मदतीला नसल्यास मोठा दुर्धर प्रसंग ओढवतो. सून अथवा मुलगा कामावरून परत येईपर्यंत घरात आजी अथवा आजोबा तसेच विव्हळत पडून राहिल्याची अनेक उदाहरणं आहेत.

अशावेळी रोग्याच्या पायात काहीही हालचाल होऊ न देता, त्याला पलंगावर उचलून ठेवावे. पाठीपासून ते पायाच्या बोटापर्यंत एखाद्या टणक फळीला पाय बांधून ठेवावा, म्हणजे त्याची ( वृद्धांची हाडं ठिसूळ झाल्यामुळं अपघतानंतर त्यांना फार काळ पडून राहावं लागतं. ) हालचाल बंद होऊन वेदना नाहीशा होतात. मांडीचे हाड मोडल्यास तिचा आकार फारच भीषण दिसतो. अशावेळी मांडीत रक्तस्त्राव खूपच झालेला असतो. परंतु जखम नसल्याने तो बाहेर दिसत नाही त्यामुळे रुग्ण चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. तेव्हा पलंगाची पायाकडील बाजू उंच करून ठेवावी आणि लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कॉलिज फ्रॅक्चर
पन्नाशीनंतर होणारे दुसरे सर्वसाधारण फ्रॅक्चर म्हणजे मनगटाच्या वरच्या हाडाला होणारे फ्रॅक्चर होय. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘कॉलिज फ्रॅक्चर’ असे म्हणतात. घसरून पडताना हातावर शारीराचा भार येऊन अथवा हातावर जड वजन पडून ही इजा होऊ शकते. पडल्यावर काही वेळातच मनगटावर सूज येते. हात वाकडा दिसू लागतो. बोटांची आणी मनगटाची हालचाल बंद होऊ लागते. खुब्याच्या फ्रॅक्चर इतके हे गंभीर नसले तरी वेळच्या वेळीच सरकलेले हाड पूर्ववत बसवून त्याला प्लेस्टरमध्ये ठेवण आवश्यक असतं. नुसतं चोळणं अथवा शेकणं यामुळं सांधा अधिकच घट्ट बसतो. हात वाकडा तर दिसतोच परंतु लिहिणं, स्वतःचे स्वतः कपडे बदलता येणं इतपतही हालचाल करणे अशक्य होते. त्यामुळे पुढची गैरसोय टाळण्यासाठी त्यावर त्वरित उपचार झाले पाहिजेत. मनगटावर सूज आल्यानंतर हात एखाद्या जाड पुठ्ठ्यात गुंडाळून गळ्यामध्ये बांधावा व तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करून घ्यावी.

संधिवात रुग्ण आणि फ्रॅक्चर
संधिवाताच्या रुग्णांच्या सांध्याच्या हालचाली बऱ्याच कमी झालेल्या असतात. हातपायांवर बाक आलेला असतो असे रुग्ण जरा वेड्यावाकड्या हालचाली झाल्या की पडतात. पाठीच्या मणक्याला बाक येणं, सांधे दुखणं. हातपाय आखडून रहाणं, अशा गोष्टी त्यांना सहजगत्या होतात. म्हणून त्यांनी काळजीपूर्वक हालचाली करून घ्यावी. उतार वयामध्ये इतर सांध्याबरोबरच विशेषतः मणक्यांची झीज मोठ्या प्रमाणावर होत असते. बरेचसे वृद्ध अगोदरच पाठदुखीने जर्जर झालेले असतात. तशातच पुढे वाकून वजन उचलने खुर्चीला अडखळून पडणे, पाठीवर जड वस्तू पडणे, इत्यांदीमुळे त्यांचे मणके अक्षरशः पिचतात. पाठीची तसूभरही हालचाल करणे अशक्य होते. अशावेळी ठणक गादीवर त्यांना झोपवून पूर्ण विश्रांती द्यावी. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पट्टा अथवा जॅकेट करून येऊन इतर औषधोपचार ताबडतोब सुरू करावा.
अपघात हे शेवटीअपघातच असल्यामुळे धडधाकट तरुन आणि प्रौढ यांचाही कधी अपवाद केला जात नाही. कधी स्टुलावर चढून वरच सामान काढताना जड वजन अंगावर पडून हातापायांची हाड मोडतात. शिडी चढताना तोल जाऊन पडल्यानं मणके तुटलेले रुग्ण नेहमी पाहावयास मिळतात. शिवणयंत्राची सुईच कधी हातात मोडते, तर कधी पाणी भरलेल्या बादल्या उचलताना पाठीत उसण भरते. वजन उचलताना घसरल्यानं खांदा सरकून अनेक रुग्ण तज्ज्ञांकडे येतात. खांदा सरकल्यानं दंडाच्या वर आणि आतल्या बाजूला मोठा गोळा येतो. हाताची हालचाल करनं अतिशय तापदायक होत. अशावेळी तिथं मालिश न करता हात एका फडक्यानं गळ्यात बांधून ठेवावा आणि तज्ज्ञ डॉक्टरकडून सरकलेला खांदा पूर्ववत बसवून घ्यावा. त्यात ढिलाई झाल्यास किरकोळ हालचालींनी सांधा वरचेवर निखळतो आणि हा दोष दूर करण्यासाठी शस्त्रक्रियेवाचून गत्यंतर राहत नाही.

दुर्लक्ष करू नका
कोपरापासून मनगटापर्यंतची हाडे मोडल्यास सूज कमी प्रमाणात येते. त्यामुळे बहुतेवेळा त्याकडे दुर्लक्ष होऊन नुसत चोळणं, शेकणं अथवा लेप देणं असे घरगुती उपाय होतात. परंतु ह्या हाडांना त्यावरील स्नायूंच्या ताणामुळे स्थैर्य नसतं म्हणून एकदा मोडल्यानंतर ती ऑपरेशन करून जुळविणे भाग असते. हा उपाय न केल्यास हाताची हालचाल बऱ्याच प्रमाणात बंद होऊन तो कामातून गेल्यासारखा होतो. म्हणून या भागातील सुजेकडे नीट लक्ष देणं आवश्यक आहे. भाजल्याचे प्रमाण घरामधील अपघातांमध्येच आपल्याला जास्त सापडेल. स्वयंपाकघराशी जास्त संबंध असल्यामुळे स्त्रिया आणि निष्काळजीपणामुळं मुलंच जास्त करून भाजतात. स्टोव्हचा भडका उडणं, उकडते पदार्थ अंगावर साडणे, ज्वालेवर शर्ट, साड्या पेटणे इ. गोष्टीकडे लक्ष पुरविल्यास बहुतेक वेळा टाळता येतात. एकदा भाजल्यानंतर सोफ्रामायसिन फ्युरासिनासारखे थंड मलम जखमेवर लावावे. शाई लावणे कटाक्षानं टाळावे. शरीराच्या बऱ्याच भागात भाजले असल्यास रुग्णाला शिरेवाटे सलाईन अथवा ग्लुकोज द्यावे लागते. वेदनाशामक औषधेही द्यावी लागतात. अशावेळी रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावे.थोडक्यात काय ? घा असो वा रस्ता अपघात हे चालुच असतात ! काळजीपूर्वक वागण्यानं मात्र त्यातले बरेचसे टाळण्यासारखे असतात. अपघात झाल्यानंतर प्रसंगावधान राखून गडबडून न जाता, योग्य प्रथमोपचार केल्यास बरेचसे धोके वाचविता येतात. त्यासाठी प्रत्येक सुजाण व्यक्तीने विशेषतः कुटुंबातील स्त्रीने प्रथमोपचारांची माहिती करून घेणं आवश्यक आहे.