Tag Archives: केशर

कच्चा मटण दम बिर्याणी

साहित्य :

 • १ किलो बासमती राईस
 • १ किलो ताजे व कोवळे बकर्‍याचे अथवा बोलाईचे मटण
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • बारीक चिरलेला पुदिना
 • सारखे केलेले आंबट दही
 • एका लिंबाचा रस
 • ४ चमचे कच्च्या पपईचा बारीक केलेला गर
 • २ टोमॅटोची ग्रेव्ही
 • अर्धा किलो तळलेला कांदा
 • लवंगा
 • दालचिनी
 • दगडफूल
 • तमालपत्र
 • शहाजीरे
 • पुदिनाची पाने
 • ४ हिरव्या मिरच्या ठेचून
 • आले-लसूण पेस्ट
 • अर्धा चमचा हळद
 • चवीपुरते मीठ
 • गाईचे तूप अथवा तेल
 • गरम मसाला
 • थोडासा इस्टर्नचा बिर्याणी मसाला
 • रंगासाठी दुधात भिजवलेले केशर
 • तूपात तळलेले काजू

कृती :

कच्चा मटण दम बिर्याणी

कच्चा मटण दम बिर्याणी

प्रथम मटणाचे तुकडे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत, त्यावर अर्धा चमचा हळद, बिर्याणी मसाला, गरम मसाला, बारीक केलेल्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, लवंगा, दालचिनी, थोडासा कापलेला पुदिना, चवीपुरते मीठ, थोडा तळलेला कांदा, शहाजीरे, सारखे केलेले दही, लिंबाचा रस, कच्च्या पपईचा रस आणि टोमॅटोची ग्रेव्ही टाकून त्यावर थोडे तूप टाकावे.

नंतर हे मिश्रण हाताने एकजीव करावे व त्यात थोडेसे पाणी टाकून सधारण २ ते ६ तास मॅरीनेट करण्यास ठेवावे.

मॅरीनेट झालेले मटण आता एका पसरट व जाडतळाच्या भांड्यात थोडेसे तूप टाकून ओतावे. आता तांदूळ शिजवून घ्यावा.

तांदूळ शिजवण्याची कृती :

एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, दालचिनी, लवंग, मसाला, २ हिरव्या वेलच्या, दगडफूल, तमालपत्र टाकावे. तांदूळ एका पातेल्यात गरम तुपात थोडे शहाजीरे टाकून भाजून घ्यावेत, नंतर त्यात गरम पाणि टाकून साधारण ४०% शिजेपर्यंत ठेवावेत.

नंतर त्यातील अर्धे तांदूळ एका मोठ्या चाळाणीत काढून घ्यावेत व यातील पाणी पूर्ण निथळू द्यावे. उरलेले तांदूळ पून्हा साधारण ६०% शिजतील इतका वेळ उकळत्या पाण्यात ठेवावे.

आधी ४०% शिजवलेल्या भाताचा एका भाताचा थर मटणावर द्यावा, रंगासाठी दुधात भिजवलेले केशर पसरुन टाकावे त्यावर थोडासा तळलेला कांदा , बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळलेले काजू, चार च्मचे गाईचे तूप टाकावे व पुन्हा वरती ६०% शिजवलेल्या भातावर वरीलप्रमाणे सर्व साहित्य पसरावे.

नंतर हे भांडे फॉईलने अथवा कणीक लावून एखाद्या ताटलीने घट्ट झाकून टाकावे व गॅस मोठा करुन ५ मिनिटे ठेवावे. नंतर गॅस मध्यम करुन साधारण ४० मिनिटे ठेवावा.

भांड्याचा तळ पातळ असल्यास तव्यावर हे भांड्याखाली ठेवावे तसेच आवडत असल्यास मटणात थोडेसे बटाट्याचे काप पण घालावे.

अश्या प्रकारे ४५ मिनिटे शिजवलेली मटण बिर्याणी अतिशय रुचकर लागते.