Tag Archives: कॉर्पोरेट

आता मराठमोळे केलॉग्स

संगीता पेंडुरकर
संगीता पेंडुरकर

संगीता पेंडुरकर हे नाव गेल्या काही दिवसांत ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात सचिन तेंडुलकरप्रमाणे झळकले आहे, शिखरावर गेले आहे.
४०० कोटींची उलाढाल असलेल्या केलॉग्स कंपनीच्या त्या सर्वेसर्वा बनल्या व या मराठमोळ्या स्त्रीशक्तीकडे संपूर्ण उद्योग जगताच्या नजरा अभिमानाने वळल्या.

पेंडुरकर या नावाचा संबंध तळ कोकणातील व फार तर मुंबईतील सोने-चांदीच्या ज्वेलर्स व्यवसायाशी आला, पण त्या पेंडुरकरने ‘मल्टीनॅशनल’ झेप घेतली.

संगीता पेंडुरकर, वय वर्षे ४४, जन्म कल्याण, उल्हासनगरच्या शाळेत त्या शिकल्या आणि पुढे संबंध आला रुईया कॉलेज आणि रुईया कट्ट्याशी. या कट्ट्यावरच तिला आत्मविश्‍वासाचे व लोकांना समजून घेण्याचे ज्ञान प्राप्त झाले. रुईयाचा कट्टा जणू ज्ञानाचा बोधीवृक्षच ठरला.
‘मी अभ्यासू होते, पण पकाऊ नव्हते,’ असे संगीता आजही सांगतात.

जन्म मध्यमवर्गीय घरातला. पाच भावंडांत सगळ्यात लहान संगीता, पण आई-वडील डॉक्टर असले तरी वेगळ्या क्षेत्रात झेप घेण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी जीवनाची प्रगती एक्स्प्रेस पकडली.

त्या डॉक्टर झाल्या नाही, पण फार्मास्युटिकलची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवली. तेव्हा त्यांना आपण पुढे काय करावे हा विचारही स्पर्श करून गेला नव्हता. आज त्या केलॉग कंपनीच्या एम. डी. पदावर आहेत. हे सगळे काही होत गेले. ‘मी फक्त माझे १०० टक्के देत राहिले आणि देवाने मला १००० टक्के परत दिले’ असेही त्या सांगतात. ‘जे करीन ते चांगले करीन’ या सिद्धांतावर त्यांचा हा प्रवास सुरू आहे.

एम.बी.ए.ला त्यांना फार चांगले गुण मिळाले होते, पण त्यांचीही एक कमालच आहे. त्या एम.बी.ए. करणारच नव्हत्या. एका जवळच्या मैत्रिणीने फॉर्म भरला म्हणून आपणही भरू, असे करत एम.बी.ए.ही झाले, तेही अव्वल दर्जाने. मैत्रिणीला सोबत म्हणून पुणे विद्यापीठातून एम.बी.ए. केल्यानंतरच संगीताला आपले ‘मार्केटिंग’ या विषयावरचे प्राधान्य लक्षात आले. ग्राहकांचा स्वभाव व मानसिकता समजून आपल्या उत्पादनाची विक्री कशी करावी यावर संगीताचे प्रभुत्व आहे. नोवारतीस इंडिया लिमिटेड या कंपनीपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. आठ वर्षे त्यांनी त्या कंपनीत मार्केटिंग व संशोधनाचा अनुभव घेतला. तिचे तेथील बॉस के. जी. अनंतकृष्णन जे आता एन.एस.डी. इंडियामध्ये आहेत ते सांगतात, ‘संगीता अत्यंत कामसू व स्वत:ला कंपनीच्या प्रगतीसाठी वाहून घेणारी आहे. नोवारतीसने काही वर्षांपूर्वी ब्लड प्रेशरवर नवीन गोळ्या बनवल्या होत्या व त्याचे ‘लॉन्च’ संगीताच्या हस्तेच झाले!’ असे त्यांचे म्हणणे. कारण समारंभाच्या दिवशी पाणी भरून मुंबई बंद पडू लागली तरी संगीताने थंाबून सर्व पार पाडले व जमेल तेवढी मदत करून कंपनीच्या सोहळ्याचा मान राखला. २००३ मध्ये एच.एस.बी.सी. बँकेचे दुबईचे काम सांभाळण्याची संधी मिळाली. ते घ्यावे की नाही या दुविधेत असताना पती संदीप यांनी पाठिंबा देऊन हे काम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना भरभरून साथ दिली. हेच त्यांचे भांडवल असे त्या समजतात. ‘मल्टीटास्किंग’ म्हणजे एका वेळेला अनेक कामे करण्याची क्षमता हे देवाचे स्त्रीला मिळालेले वरदानच आहे. घरात पाच पाहुणे आले की त्यांचे हसतमुखाने स्वागत करणे, त्यांना बसवून पाणी देणे हे करता करता ती मध्येच स्वयंपाकघरात जाऊन चहा चढवते. परत बाहेर येऊन पाच मिनिटे गप्पा मारते. चहाच्या बाजूला कढईत पोह्याची तयारी असते. कप, प्लेट तयार असतात टेबलावर. चहा-पोहे पाहुण्यांपर्यंत पोहोचतात आणि तरीही त्या गप्पांमधून बाहेर पडल्यासारखे पाहुण्यांना वाटत नाही. हे पुरुषांना करणे सहसा जमत नाही आणि कॉर्पोरेटची ‘मल्टीटास्किंग’ची गरज रोज वाढत असल्यामुळे स्त्रियांचे कॉर्पोरेटमधील महत्त्व वाढत चालले आहे हे संगीता पेंडुरकरांचे मत अगदी पटण्यासारखे आहे. आपल्याचे प्रोत्साहन आणि विश्‍वास हे त्यांचे भांडवल ते इतर सहकार्‍यांसोबत वाटतात.

त्यांच्याबरोबर काम करणार्‍या सर्वांना त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्यात चांगले बदल कसे घडवता येतील हेही सुचवतात. वैयक्तिक जीवन आणि काम यात समतोल करणे हे त्यांच्याकडून शिकावे. आपल्या माणसांना पुरेसा वेळ दिला आणि त्यांना समजून घेतले की आयुष्य सोपे होते. ऍलगोरिहम टेक प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर, संगीताजींचे पती संदीप पेंडुरकर यांचे प्रेम आणि पाठिंबा हा यशाचा एक महत्त्वपूर्ण भाग त्या समजतात. ते दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारतात. आयुष्यातील व कामासंबंधित घडामोडींबद्दल चर्चा करतात.

‘मानसिकरीत्या जवळ असलो तर किलोमीटरचा फरक जाणवत नाही’ असे त्या म्हणतात. संगीत, फिरणे आणि खरेदी हे दोघे नवराबायकोचे छंद ते फार आनंदाने जोपासतात व कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ देतात. कोकाकोला सोडून केलॉग्स इंडिया परिवारात सामील होताना त्यांना आपली जबाबदारी वाढल्यासारखे वाटले, पण आपण जे करू ते चांगलेच हेही त्यांना माहीत आहे. आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यात घालवलेला वेळ हे त्यांचे अति आनंदाचे क्षण असतात. ‘हा काहीच करू शकणार नाही’ असे एखाद्याबद्दल ऐकले की त्याच्याकडून खूप चांगले काम करून घ्यावे हा ध्यास ते धरतात आणि हा खेळच त्यांच्या प्रगतीचे कारण आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून खूपजण झगडत असतात. पाच वर्षांपूर्वी आई गेली हा त्यांच्या जीवनातला सर्वात दु:खद क्षण. ‘मी माझ्याबरोबर काम करणार्‍या सर्वांची आई आहे असे समजते. या विचारातच मला आईचे दर्शन होते’ असे ऐकून मला फार आनंद झाला. एक मराठी नाव एका मोठ्या पदावर जाते तेव्हा आपण अभिमानाने त्यांच्याविषयी बोलतो. संगीताचे म्हणणे असे की ‘मोठे व्हा आणि मोठे करा, मोठे होऊन थांबू नका.’ हा विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. कल्याणच्या न्यू लुर्डस शाळेपासून ते केलॉग्स इंडियाच्या एम.डी. पदापर्यंतचा प्रवास अगदी सुतासारखा सरळ नव्हता. पण काहीतरी मोठे करण्याची जिद्द मात्र या प्रवासाला अगदी रम्य करून टाकते. स्त्री म्हणजे बिचारी नव्हे, मराठी म्हणजे सामान्य नव्हे आणि पेंडुरकर म्हणजे फक्त सोनार नव्हे. ‘‘माणूस कुठूनही, कुठेही पोहोचू शकतो. फक्त त्याला पोहोचायचे असले तर.’’ संगीताजींच्या या वाक्याला ‘थ्री चिअर्स’. केलॉग्सने आता पोहे विकले तरी आश्‍चर्य नको…. आता मराठी माणूस तिथे पोहोचलाय!