Tag Archives: कोल्हा

लांडगा, कोल्हा आणि वानर

एका वानरास पंच करून, त्याजपुढे लांडग्याने कोल्ह्यावर चोरीची फिर्याद आणली. त्या पंचाइतीची मौज पहावयास इतर पशुही सभेस आले होते. लांडग्याचे भाषण संपल्यावर कोल्ह्याने जबाब दिला की, ‘मी लांडग्याची वस्तू चोरली नाही.’ नंतर एकंदर खटल्याचा विचार करून व पुरावा पाहून वानराने निकाल दिला. तो लांडग्यास म्हणाला, ‘अरे, तुझी स्वतःची अशी कोणतीही वस्तू गेली नाही. आणि कोल्ह्यास म्हणाला, ‘तू चोरी केलीस यात मुळीच संशय नाही.’ याप्रमाणे ते दोघेही लबाड, असे ठरवून सभा उठली.

तात्पर्य:- लुच्चा म्हणून ज्याची एक वेळ प्रसिध्दी झाली त्याचे म्हणणे कोणी खरे मानीत नाही. लांडगा हा दुसऱ्याची मेंढरे मारून खाणारा आणि कोल्हा हा पका ठक, असे प्रसिध्द आहे, म्हणून तसा न्याय झाला.