Tag Archives: कोहिनूर

अवघे पाऊणशे वयमान

उत्कर्ष महिलामंडळ मंगळागौरी ग्रुप

श्रावण महिना आला की, व्रत, वैकल्ये सुरु होतात, श्रावणातील मंगळागौरीची पूजा ही तर स्त्रीयांसाठी आनंदाची पर्वणी असते. परंतु दिवसेंदिवस वाढत्या शहरीकरणा बरोबर मध्यंतरीच्या काळात मंगळागौरीचे खेळ लुप्त होतात की, काय अशी भिती निर्माण झाली होती परंतु ’जूनं ते सोनं’ या उक्ती प्रमाणे अलिकडे आपल्या सगळयाच परंपराचं पुनरुज्जीवन होताना दिसतंय. आता तर मंगळागौरीला खास मंगळागौरीच्या ग्रुप्सना मंगळागौरीचे खेळ खेळायला बोलवलं जातं. आज महाराष्ट्रात जवळपास ४० असे महिलांचे ग्रुप्स आहेत परंतु त्यातही कल्पना ताईंचा मंगळागौरीचा ग्रुप वैशिष्ट्यपुर्ण आणि तितकाच उल्लेखनीय ठरतो. इतर ग्रुप प्रमाणे थाटमाट या ग्रुपकडे नाही पण खर्‍या अर्थाने संस्कृती रक्षणासाठी मैदानात उतरलेला असचं कल्पना ताईंच्या या ग्रुपचं वर्णन करावं लागेल. कल्पना पाटील यांनी १० वर्षांपुर्वी उत्कर्ष महिला मंडळाच्या माध्यमातून मंगळागौरीच्या ग्रुपची स्थापना केली त्यावेळी तर आजच्या सारखे मंगळागौरीचे ग्रुप्सही नव्हते आणि स्पर्धाही नव्हत्या. समाजकार्य आणि संस्कृतीरक्षण या उद्देशाने सुरु केलेला हा उपक्रम आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून आहे त्याला कारणं ही तशीच आहेत. कल्पना ताईंच्या या ग्रुप मध्ये १५ जणी आहेत आणि त्याही पन्नाशी आणि साठी ओलांडलेल्या. हा ग्रुप कोणतेही मानधन स्वीकारत नाही. फक्त जाण्या-येण्याचा खर्च आणि कोणी स्वेच्छेने मानधन दिले तर स्वीकारायचे आणि तेही अनाथ आश्रमाला द्यायचे. या ग्रुपमधल्या सर्वच महिला सुखवस्तू आहेत असेही नाही परंतु केवळ आवड आणि समाजकार्य या हेतूने त्या या उपक्रमात समरस होतात. सात वर्षांपुर्वी मॉरिशसच्या मराठी फेडरेशन ने कल्पना ताईंच्या ग्रुपला मॉरिशस मध्ये आमंत्रित केल होतं. तिथे तर त्यांची वाहवा झालीच पण स्वदेशी आल्यानंतर ही त्याचं भरभरुन कौतुक झालं परंतु कल्पना ताईंना खंत होती ती वेगळीच. काही आर्थिक आणि तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या ग्रुपमधील काही सदस्या मॉरिशसला जाऊ शकल्या नाहीत. परदेशातल्या आयोजकांकडून मिळणारं मानधन अल्प असते शिवाय जाण्यायेण्याचा खर्च आपला आपण करायचा असतो आणि तो प्रत्येकीला परवडतोच असे नाही.

कल्पना पाटील

कल्पना पाटील

कल्पना ताईंच्या ग्रुपमधले काही सदस्य वयोमानानुसार बदलले परंतु त्यांची जागा तितक्याच हौशी आणि कुशल सदस्यांनी घेतली. ग्रुप तयार करताना कल्पना ताईंना अडचणी आल्या पण त्या येणारच असं ग्रॄहीत धरुनच त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली, स्टेज डेअरिंग तर सोडाच पण धड शुद्ध मराठी ही बोलू न शकणार्‍या ग्रृहिणींमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना यात सामील होण्यास त्यांनी प्रवृत्त केलं. या नागपंचमीला तर सलग तीन खेळ करुन त्यांनी पुन्हा एकवार आपली कार्यक्षमता सिद्ध केली. श्रावणातला सोमवार तोही निर्जळी आणि सलग तीन खेळ तेही पन्नाशी आणि साठी ओलांडलेल्या वयात hats off to these ladies नागपंचंमी च्या दिवशी या ग्रुपने पुण्यातल्या ‘मिलेनियम’ शाळेसाठी केलेला मंगळागौरीचा खेळ पाहुन कोणालाही भरुन येईल. शाळेच्या पटांगणात चिमुरडयांसाठी मंगळागौरीचा खेळ रंगवताना या आज्यांना पायाला टोचणार्‍या खडयांचेही भान राहिले नाही. या गृप मधल्या मालन राऊत तर गेली २० वर्ष आजारी असलेल्या आपल्या पतीची सेवा करुन या खेळांमधे सहभागी होतात. जयश्री कविटके तर १२ मुलांचा जेवणाचा डबा देवून या खेळासाठी बाहेर पडतात. कौशल्या तनपुरे आणि पार्वती यादव तर आपली पावसाळी शेतकामे उरकून येतात बदल्यात त्यांना मिळतं ती फक्त दाद. केवळ तुमच्या आमच्या चेहर्‍यावरील आनंद बघण्यासाठी त्यांचा हा खटाटोप. सात हजारापर्यंत मानधन स्विकारणार्‍या मंगळागौरीच्या ग्रुपच्या शर्यतीत आम्ही नाही. संस्कृती जोपासण्याच्या नावाखाली मंगळागौरी खेळांचा बिजनेस होतो आहे असं कल्पना ताई म्हणतात. कुठच्याही जहिरातीविना कल्पनाताईंचा हा शो हाउस फुल्ल असतो.

कल्पनाताईं अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रामातही विनामुल्य खेळ करतात. विषेश म्हणजे या ग्रुपच्या नामावलीत काही अमराठी नावं ही दिसतात. या अमराठी महिला मराठी महिलांइतक्याच या उपक्रमात समरसून गेल्या आहेत. उत्कृष्ट खेळ करणार्‍या एकीला दर वर्षी साडी देऊन गौरव करण्याची प्रथा ग्रुप मध्ये सुरु करण्यात आली या निमीत्ताने ग्रुप मधल्या सगळया जणींना साडया मिळाल्या. तीन आठवडयापूर्वी त्यांच्या ग्रुपमधल्या शिल्पा यादव यांच निधन झालं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आता ट्रॉफी देण्यात येणार आहे. अशा अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कल्पनाताईंच्या ग्रुपची दखल माध्यमांनीही घेतली. ‘पुणे फेस्टिवल’ आणि ‘नवरात्र फेस्टिवल’ मध्ये त्यांना गैरवण्यात आलं. कल्पनाताईंना आता सगळ्याच महिलांना घेऊन पुन्हा परदेशवारी करायची आहे. यासाठी त्यांना स्पॉन्सर्सची आवश्यकता आहे. मुकबधीर मुलांसाठीही त्या लवकरच  कार्यक्रम करणार आहेत. कल्पना ताईंचा व या ग्रुप चा हा प्रवास खरच थक्क करणारा आहे. या सगळयाजणींचा सळसळता उत्साह आणि चैतन्य पाहून एवढच म्हणावंसं वाटतं ’अवघे पाऊणशे वयमान’.

कल्पना ताईंच्या सामाजिक कार्यांचे विविध पैलू पुढच्या लेखात उलगडणार आहे.

उत्कर्ष महिलामंडळ मंगळागौरी ग्रुप

 • कल्पना पाटील
 • जयश्री एकबोटे
 • जयश्री कवीटके
 • कौशल्या तनपुरे
 • मालन राऊत
 • लता एरोडेकर
 • मेधा मराठे
 • तृप्ती पारेख
 • अरुणा मोरे
 • पार्वती यादव
 • स्वाती शहा
 • मेधा गवळी
 • सुषमा पारेख
 • मंगला घोटने
 • कलप्ना साठे

कल्पना ताई आणि त्यांच्या सख्या मंगळागौरीच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजकार्याला मराठीमाती चा सलाम.