Tag Archives: कौटुंबिक मीलन

कौटुंबिक मीलन

पूर्वी जेवणाच्या वेळी सर्व कुटुंबीयांनी उपस्थित असले पाहिजे, हा संकेत असायचा. कौटुंबिक मीलन व स्नेहभोजन असेच स्वरूप असायचे. आता प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे ते जमतेच असे नाही. आजकाल तर घरात असूनही जेवावयास सर्व एकत्र बसत नाहीत. कोणी टी.व्ही. ला चिकटलेला असतो तर कोणी अंथरुणावर आळसाने लोळत असतो एखादी कादंबरी वाचत असतो. पण याहीपेक्षा चिंताजनक बाब म्हणजे कुटुंबप्रमुख य गृहिणी तसा आग्रह धरत नाहीत. इतकेच नव्हे तर आजीआजोबांनी तसे म्हटले तरी सूनबाई मुलांच्या वतीने कारणे सांगतात. यातून प्रत्येकाला आपण स्वतंत्र, आपण वेगळे असे वाटू लागते. एकत्वाची नव्हे तर दूरत्वाची, विभक्तत्वाची भावना वाढीस लागते. आज अनेक समाजचिंतक दिवसातून कमीत कमी एकदा तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्याची, सर्वांची विचारपूस करण्याची आवश्यकता आग्रहाने प्रतिपादन करू लागले आहेत. विधिमंडळाने वा लोकसभेचे अधिवेशन सुरू व्हायच्य आदल्या दिवशी अनुक्रमे मुख्यमंत्री वा पंतप्रधान सर्वांना चहापानाला बोलावतात ते बहुधा याचसाठी असावे. उद्या अधिवेशन सुरू झाले की, कदाचित मतभेद होतील, आपण हमरीतुमरीवर येऊ, पण तरीही आपण सगळे एक आहोत. या एकाच देशाचे पाईक आहोत, ही जाणीव जागती राहावी असाही हेतू असावा. विरोधाची भूमिका घेऊन एकत्र येणे व एकत्वाची भावना घेऊन विरोध करणे यात जमीन‍अस्मानाचे अंतर आहे.