Tag Archives: क्वारीओकोर

कुटुंब नियोजन

हा सुखी व समाधानी कौटुंबिक जीवनाचा आधारस्तंभ आहे.

जगातील महान तत्त्वज्ञांच्या विचारांचा आणि आयुष्याचा अभ्यास करणार थोर लेखक, तत्वज्ञ आणि शिक्षा तज्ज्ञ ‘विल ड्यूरँट’ याला दुख म्हणजे काय? असे एकदा विचारले असता आपल्या गतायुष्यातील आनंदी वर्षाचा मागोवा घेत तो उद्बारला. मी ज्ञानामध्ये आनंद शोधला पण माझा भ्रमनिरास झाला, लेखनमध्ये आनंद शोधू जाता मानसिक श्रमच माझ्या हाती आले, प्रवासामध्ये आनंद धुंडाळताना मी थकून गेलो, संपत्तीमध्ये आनंद सापडविण्याचा प्रयत्न करताना फक्त मतभेद आणि काळजीच माझ्या पदरात पडली.. आणि शेवटी एकदा समुद्रकिनाऱ्याजवळच्या रेल्वे स्टेशनवर आपले झोपलेले बालक हातात घेऊन वाट पाहात असलेली एक स्त्री मला दिसली. स्टेशनात आलेल्या गाडीतून एक पुरुष उतरला. त्या स्त्रीकडे जाऊन त्याने तिला आलिंगन दिले आणि ते छोटे मूल जागे होणार नाही याची दक्षता घेत त्याने त्या मुलीचा हळूवारपणे पापा घेतला.. अणि मग ते सर्वजण शेतावरच्या त्यांच्या घराकडे मोटारीतून निघून गेलेल… आणि मला वाटले की, तेच कुटुंब खऱ्या अर्थाने आनंदी होते.

नेहमीच्या साध्या कौटुंबिक आनंदामधून मन, हृदय आणि आत्मा यांना येणाऱ्या या अमूल्य आनंदाची जाणीव अस्णारी एक व्यक्ती या नात्याने विल ड्यूरँट याने ही व्याख्या केली असावी, एक तत्त्वज्ञ किंवा शिक्षणतज्ज्ञ म्हणून नव्हे ! आनंददायी विवाह सौख्य आणि सौख्यदायी कौटुंबिक आयुष्य याखेरीज जीवनाच्या अंतिम ध्येयाची पूर्ती होऊन शकत नाही.. किंबहुना सर्व आनंद, समाधानाची हीच गुरुकिल्ली आहे.

असे जर असेल तर सुखी कौटुंबिक जीवन म्हणजे काय ? ते काही आपोआपच मिळत नाही. आपल्या ध्येयासाठी, यशासाठी जसे आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, तसेच सुखी वैवाहिक जीवनसाठी सुद्धा ! विवाहाच्या बरोबरच व्यवस्थित पूर्वतयारी, अथक प्रयत्न, यशाची इच्छा, कुटुंब आणि घराच्या कल्याणकरता सत्त वैवाहिक भागीदाराबरोबर प्रयत्न करण्याच्या वचनाच्या पूर्तीचा निर्धार हे सर्व येते. सुखी वैवाहिक जीवनाकरता प्रेम बुद्धी आणि प्रामाणिकपणा या सर्वांचीच आवश्यकता असते. .. पती आणि पत्नई या दोघांच्या संयुक्त प्रायत्नांमधूनच सुखी वैवाहिक जीवनाचा पाया रचावा लागतो … कुटुंब संस्थेची वाताहत, बेकारी शहरातील लोकसंख्येचा वाढता ताण, गरिबी नसली तरी आर्थिक ओढाताण, शिक्षणाची आबाळ, आरोग्याची हेलसांड, पोषक आहाराची कमतरता, अपुऱ्या वैद्यकीय सोयी, पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयी… आणि आधुनिक समाजजीवनाच्या समस्यामुळे कौटुंबिक जीवनावर मोठाच ताण पडतो.

कुटुंबाच्या आनंदाचा आधार : मूल
या सर्वात मुलांचा वाटा कोणता ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. बालके ही स्वतः आनंदमय असतात. विवाहबंधनाच्या सौख्याचे दायित्व त्यांच्यावरच असते. ‘लग्नाची  एक अपघाटी परिणती, एक पश्चातबुद्धी म्हणजे मुले, असे नसून तो वैवाहिक जीवनाचा पायाच होय. पती आणि पत्नी यांच्यामधील स्नेहाचा बंध म्हणजेच मुले ! मुली घर आणि संसार घडविण्याच्या कर्तव्याचे केवळ मुलांमुळेच वैवाहिक जीवनाच्या मूलभूत आनंदात रूपांतर होते !‘केवळ संतती थांबविणे’ याच उद्देशाने कुटुंब नियोजनाकडे पाहिले जाते हे दुर्दैवाने खरे आहे. ‘लोकसंख्येचा विस्फोट, मानवसंख्याशास्त्र, देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य,’ अशाच दृष्टिकोणातून सर्वजण पाहाताट. त्याकडे सुखी कौटुंबिक जीवनाचा आधारस्तंभ म्हणुन फारसे कधी पाहिले गेलेच नाही. ‘मूल न होणाऱ्या जोडप्यांना मूल होण्यास मदत करणे, ज्यांची मुले प्रसूतीपूर्वी वा बाळंतपणामध्ये दगावतात अशांवर उपाययोजना करणे, हा कुटुंबनियोजनामागचा खरा हेतू आहे. मुले जगून शारीरीक व मानसिकदृष्ट्या सुदृढ झाली पाहिजेत. त्यांना मोठेपणी देशाचे जबाबदार नागरिक बनण्यास मदत केली पाहिजे.

निरोगी माता : सुखी कुटुंबांचा महत्त्वाचा घटक :
कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा मोठा भाग आई व तिचे मूल यांची काळजी हा आहे. प्रसूती आधी व नंतरच्या काळात मातेची काळजी घेतली जाते. हे माता व गर्भ दोघांच्याही दृष्टीने आवश्यक असते. मूल आईच्या अंगावर पीत असताना, तसेच नंतर अन्न घेऊ लागल्यावर त्याची काळजी घेतली जाते. त्याला जीवनसत्त्वांच्या औषधांबरोबरच देवी, पोलिओ, टी.बी., डांग्या खोकला अशा या वयातील जीवघेण्या रोगांविरुद्धच्या लसी टोचल्या जातात. आई याच कालावधीमध्ये स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या पोषणाच्या जबाबदाऱ्याही समजावून घेते. आणि त्यांचे आरोग्य नीट राहाल म्हणून सतरा ते पस्तीस याच वयोमर्यादेमध्ये त्यांना मूल होणे, तीनपेक्षा जास्त मुले न होणे, तसेच दोन मुलांमध्ये कमीतकमी दोन वर्षांचे अंतर असणे आवश्यक असते. सुखी संसाराचा ‘निरोगी माता’ हा महत्त्वाचा घटक असल्याचे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

‘कमी वर्षांच्या अंतराने बरीच मुले होणे’ हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा घातक असते. घरात एक लहान मूल असतानाच दुसरे झाल्यास वा येऊ घातल्यास मातेला तरी त्या छोट्या मुलाची योग्य काळजी घेणे कसे जमेल ? मुलांना अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या एका आजाराला आफ्रिकेमध्ये ‘क्वारीओकोर’ असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ आहे, ‘लहान मुलांना घरात अजून एका बालकाचे आगमन झाले असताना होणारा रोग’.. मुख्यत्वे याच कारणाकरता, ‘दोन मुलांमध्ये अंतर असावे असे कुटुंबनियोजन चळवळ सांगते. ‘पहिले मूल आता नको, दुसरे लगेच नको, तिसरे नकोच नको !’ म्हणूनच जादा मुले असणाऱ्य स्त्रियांना कुटुंब नियोजन करण्यास मदत करणे हे त्यांच्या स्वतःच्या आणि समाजाच्याही कल्याणासाठी महत्त्वाचे ठरते.

या सगळ्यांमध्ये पुरुषालाही कसे विसरून चालेल? त्यांचे स्वातंत्र्य अनेक मुलांच्या जबाबदारीचा ताण पडून नष्ट होते. गरीबी, आजारपणे, गर्दी कलकलाट यामुळे त्यांच्यकडून मुलांची नीट काळजी तर घेतली जात नाहीच परंतु त्याच्याही आरोग्याला आणी स्वास्थ्याला हे सर्व हानीकारक असते. दिवसभर कष्ट उपसल्यानंतर घराच्या आनंदी आणि शांततामय वातावरणात परत येणे कोणाला प्रिय असणार नाही ? पण ‘छोटेच कुटुंब’ या सर्व गोष्टी देऊ शकते.

जबाबदार पालकत्व
याच्याच अनुषंगाने पुढे येणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलांची संख्या किती असावी ? पुरेशी माया करता येतील, नीट काळजी घेता येईल एवढीच! ‘ असे चटकन या प्रश्नाचे उत्तर देता येईल. मुले स्वतंत्र होईपर्यंत त्याच्या सर्व गरजा पालकांनाच पुरवाव्या लागतात. आणि ते सुद्धा वाढत्या खर्चाने ! लहान मुलांचा खर्च काही फारसा येत नाही. परंतु मोठ्या मुलांना सर्वच गोष्टी जास्त प्रमाणावर लागतात. पालकांना त्याच्या बौद्धिक सामाजिक, मानसिक आणि भावनिक गरजाकडेही पाहावे लागते. ‘मुलांशी खेळण्यात, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात त्यांची जरूर आहे-’ अशी भावना मुलांमध्ये उत्पन्न करण्यात पालकांना प्रयत्नपूर्वक वेळ द्यावा लागतो. फक्त आईवडीलच देऊ शकणाऱ्या प्रेमाची मुले भुकेली असतात. मुले हवी असतील तर त्यांना लागणाऱ्या याही गोष्टी त्यांना मिळत आहेत याकडे पालकांचा कटाक्ष असला पाहिजे. आपल्याकडे आपल्या पालकांचे लक्ष नाही, त्यांना आपण नको आहोत असे मुलांना वाटल्यास ती मानसिकदृष्ट्या दुःखी होतात.. त्यांची मानसिक स्थित्यंतरे सुरळीतपणे पूर्ण होत नाहीत, आणि याचा परिणाम लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामध्येही होऊ शकतो. यासाठीच आपली मुलांबद्दलची कर्तव्ये पालकांनी ओळखली पाहिजेत ‘जबाबदार पालकत्वाचा’ हाच अर्थ आहे.

पुरुषांना तंत्रज्ञ होण्याचे किंवा स्त्रियांना परिचारिकेचे वा शिक्षिकेचे प्रशिक्षण देण्यात येते. परंतु समाजातील युवकांना कोणतेही शिक्षण न देताच आपण त्यांना विवाह आणि पालकत्वाच्या जबाबदाऱ्यामध्ये ढकलतो ही खेदाची गोष्ट नव्हे काय ? या शिक्षणाची सुरुवात मुलांच्या लहान वयातच पालकांच्या पुढाकाराने व देखरेखीखाली घरांमध्येच व्हायला हवी. शाळेत प्रथम आरोग्यशिक्षणावर भर देऊन नंतर लैंगिक, तसेच लोकसंख्याविषयक शिक्षणही कॉलेजमध्ये दून तरुण पिढीला जबाबदार वैवाहिक संबंध, पालकत्व आणि कौटुंबिक आयुष्याची माहिती करून दिली पाहिजे.

कुटुंब नियोजनाच्या ( दोन मुलांमध्ये अंतर राखण्याचा ) पद्धती- निरोध, पोटात घ्यावयाच्या गोळ्या, ‘कॉपर टी’, इत्यादी स्वस्त असून सर्वांनाच उपलब्ध आहेत. आजचे पालक आणि तरुण म्हणजेच भविष्य काळातील पालक यांना संतती नियमनांच्या साधनांची माहिती अशक्यच आहे. तरीसुद्धा त्यांना याची माहिती करून देणे हे डॉक्टर या नात्याने आमचे कर्तव्य आहे. “कुटुंब नियोजनाचा समावेश समाजाच्या दैनदिन जीवनामध्ये व्हावा.” हा विचार वाढत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूच्या दुकानांमधून पारंपारिक तसेच पोटात घ्यावयाची कुटुंब नियोजनाची साधने अत्यंत सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजेत. दोन अथवा तीन अपत्ये झाल्यानंतर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रियेची सोयही सहज आणि विनामूल्य उपलब्ध आहे. पुरुष स्त्री कोणावरही कायमची शस्त्रक्रिया करण्यासाठी आज जवळच्या कुटुंबनियोजन केंद्रापर्यंत फक्त जावे लागते. तिथे सगळ्या सोयी उपलब्ध असतात.

कुटुंब नियोजन ही समाजाचीही जबाबदारी आहे.
आपल्या गजबजलेल्या शहरांपासून ते दूर खेडेगावापर्यंत कुटुंबनियोजनाचा हा संदेश परिणामकतेने पोहोचला पाहिजे. ‘ सरकारनेच काहीतरी याबाबतीत करण्याची’ वाट पहात स्वस्थ बसून आपल्याला चालणार नाही. सुशिक्षितांनीच लोकमत तयार करून हा संदेश दूरपर्यंत फैलावला पाहिजे. असे झाले तरच ‘कुटुंबनियोजन’ ही एक सामाजिक चळवळ होईल. कुटुंब नियोजन ही काहीतरी भीतिदायक अथवा जबरदस्तीने लादण्यात आलेली गोष्ट आहे, अशा दृष्टीमे त्याकडे बघणे अयोग्य आहे. कुटुंबनियोजन सुखी, आरोग्यसंपन्न दीर्घायुष्याचे एक साधन म्हणून त्याकडे पाहाणे आवश्यक आहे.

आपले घर आणि कौटुंबिक संबंध याच्याइतके दीर्घकाळ टिकणारे आणि महत्त्वाचे आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये इतर काहीही नाही. प्रेम विवाहसौख्य कौटुंबिक संबंधाचा आनंद हे आयुष्यातील चांगल्या गोष्टींचे संपूर्ण सौख्याचे निधान आहे… आणि ते अपल्यालाही प्राप्त व्हावे अशीच आमची इच्छा आहे !