Tag Archives: गंजिफा

दैनंदिन जीवनातील कला

शेषशायी विष्णू रंगविलेले लाकडाचे कोरीव छत, इ.स. १९ वे शतक

महाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. इतिहासपूर्व व त्यानंतरच्या काळातील आणि ऐतिहासिक कालांतील विविध संस्कृतीच्या उदयास्ताच्या खुणा आणि अवशेष या भूमीतील त्या त्या काळाच्या विविध स्तरांचे असल्याचे उत्खननात आणि संशोधनात आढळून आले आहे. संस्कृतीच्या या मूक साक्षीदारंनी येथील संस्कृतीचा इतिहास बोलका केला आहे.

पैठण, तेर, इनामागांव अणि महुरझरी येथे केकेल्या उत्खननात आणि संशोधनात येथील संस्कृतीच्या व लोकजीवनाच्या विविध पैलूंचे घडविणाऱ्या अनेक वस्तू आणि कलावशेष सापडले आहेत. यामध्ये, फुटलेली मातीची भांडी आणि त्यांचे तुकडे, मणी बांगड्याचे तुकडे, कलावशेष , अवजारे, नेहमीच्या वापरातील, भांडी, टेराकोटाच्या मुद्रा त्याचप्रमाणे हस्तीदंती, हाडाच्या, धातूच्या आणि लाकडाच्या वस्तू आणि शिल्पे आहेत. समाध्या आणि इतर पवित्र ठिकाणॆ कोरलेले शिलालेख, ताम्रपट, तसेच इतर अनेक ठिकाणी कोरलेली बोधचिन्हे आणि लेख यांचाही इतिहासाच्या या अमोल साधनात समावेश आहे.

प्राचीन काळातील स्त्री-पुरुषांचे जीवन कसे होते, त्यावेळचे लोक कसे राहात, काय खात, त्यांच्या संवयी कोणत्या होत्या. धर्म, तत्वज्ञान, कला आणि सौन्दर्य, विज्ञान आणि तंत्रविद्या तसेच ज्ञानाच्या इतर विविधा शाखा यांबाबत त्यांचे विचार आणि संकल्पना कोणत्या होत्या याची कल्पना उत्खननात व संशोधन सापडालेल्या या विविध वस्तूंवरून येते. प्राचीन काळातील हा धार्मिक वारसा नंतरच्या काळात बौद्ध , जैन आणि हिंदूंच्या निवासी गुफांत, लेणी गुंफा मंदिरे आणि विहार व त्यानंतरच्या काळात मंदिरे आणि वैभवशाली प्रासादांच्या रूपाने अधिक संपन्न झाला आणि संस्कृतीचा हा नंदादीप अखंड तेवत राहिला.