Tag Archives: गहुंजे

सुब्रतो रॉय स्टेडियमजवळ तुकोबारायांचे स्मारक

Saint Tukaram Maharaj Monument

संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचे स्मारक अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आणि महाराष्ट्र असोशिएशनच्या सहकार्याने गहुंजे येथे सुब्रतो रॉय स्टेडियमजवळ उभारण्यात येणार आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाने गहुंजे येथील सुब्रतो रॉय क्रिकेट स्टेडियमच्या प्रवेशद्वारास संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी केली होती. आंदोलनाचा इशारा देखील त्या बाबत देण्यात आला होता. याबाबतचा पाठपुरावा गेल्या दोन वर्षांपासुन करण्यात येत होता. दिल्लीत वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा होती.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे, सचिव संतोष शेलार, मुकुंद राऊत, निर्गुण बोडके आदींची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएनचे अध्यक्ष अजय शिर्के, तेजपाल शहा, सुधाकर शहनवाज आदींबरोबर हा पेच मिटविण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली.

संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमनाचे स्मारक स्टेडियमच्या पूर्वेस वनविभागाच्या जागेत उभारण्याच्या निर्णयावर एकमत झाले. क्रिकेट मंडळाने यासाठी तयारी दर्शविल्यामुळे येथील वादावर पडदा पडला आहे. आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी वारकरी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे, संतोष शेलार, मुकुंद राऊत यांची पैठण येथील वारकरी मंडळाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जागेबाबतची चर्चा झाली.

वारकरी मंडळाच्या वतीने पाचपुते यांना त्यावेळी जागेच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. पाचपुते यांनी संबंधित जागा मागणी प्रस्तावाची फाईल वनविभागाला सादर करण्याचे सांगितले. नंदकुमार भसे व संतोष शेलार यांनी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पाचपुते यांनी दिले असल्याचे सांगितले.