Tag Archives: गांधी टोपी

झेंडा

आजचा दिवस जरा खास होता, एक तास लवकर सुरू झाल्याने. झोप पुर्ण न झाल्याची ब्रेकींग न्यूज दिवसभर कवटीच्या आत-बाहेर रेंगाळणार होती.

दोन दिवसानपुर्विच नेहरू आणि पायजमा करकरीत इस्त्री करून घेतला असल्याने तो प्रश्न सुटला होता. राजाभाऊंनी कालच दोन डझन प्लॅस्टीकचे झेंडे आणुन ठेवले होते(हल्ली कागदी झेंड्यांची फॅशन नसल्याने आणि कापडी झेंडे परवडत नसल्याने).

‘राजाभाऊ’ मी ओरडलो.

‘काय मालक’ राजाभाऊंच उत्तर.

‘अरे त्या कोल्हापुरीला पॉलीश करायचीय, पॉलीश शिवाय बरं दिसेल काय?’.

‘मालक मी रात्रीच करून ठेवलीय की’ राजाभाऊंनी आत्मविश्वासानं दिलेल उत्तर मला आवडल.

फटाफट आंघोळ झाली, नंतर कपडे वगैरे..

चकाकणारी कोल्हापुरी चप्पल घालुन मी आरष्यात स्वत:ला नमस्कार करून घेतला.. आणि ..

राजाभाऊंनी केलेल्या खास आमलेटाचा बेत संपवुन, घराबाहेर पडलो.

कार्यकर्त्यांची गर्दी होती, थोडीफार.. सगळे बिचारे थंडीने पार गारठलेले त्यातल्या एका अनुभवी कार्यकर्त्याने माझ्या डोक्यात टोपी नसल्याचे खुनवले. मला तो इशारा कळण्याच्या आतच आप्पान्नी माझ्या हातात एक करकरीत आणि कडक गांधी टोपी दिली, मी आता ती टोपी घालुन स्कॉर्पीओ ९९९९ मध्ये बसलो होतो. काय तो रूबाब!.

zenda
झेंडा

रंग्याने गाडीला स्टार्टर मारलेला होता, आमची पहीली भेट तालुक्याच्या शाळेला होती, दुसरी शासकीय रुग्नालय, वाचनालय, वसतीगृह वसतीगृहानंतर व्यापारी बॅंकेत मात्र जवळचे सर्व झेंडे संपले असल्याने सिग्नलवर काही झेंडे विकत घेणे भाग होते(झेंडे विकत घेणे, हा प्रकार माझ्यासाठी तसा नवा होता). सिग्नलवर एक शेंबड पोरग हातात झेंडे आणि कडेवर एक काळवंडलेल तान्ह नागडं बाळ घेऊन आमच्या जवळ आलं ‘पाच का दो साहब’ मी म्हटलो १० चे ६ देतो का? हो-ना करता १० चे ५ झेंडे घेऊन व्यवहार फायनल झाला.

व्यापारी बॅंकेत मामाजी सत्कारासाठी पुढे आले नंतर भाषण वगैरे सर्व कसं नियोजीत, भाषणात सर्व थोरांचा ऊल्लेख करून झाल्या नंतर भाषणाची सांगता केली नंतर चहा-पाणी ..परतीचा प्रवास.

रात्री डाक बंगल्यावर आमदार साहेबान सोबत तालुक्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विषेश बैठक ठेवलेली होती त्याच बरोबर तालुक्यातील कलावंतांचा एक छोटेखानी कार्यक्रमही ठेवला होता(अमेरिका, जर्मणी, रोम इ.. देश फीरूनही माझे पाय घट्ट मातीशी होते. माझ्या संस्कृतीचा, कलेचा मला मला अभिमान होताच) तालुक्यातील दुख:, प्रश्न बघुन मन खिन्न होत असतेच त्यामुळे कार्यकर्त्यांनी औषधाची सोय आधिच केली होती.

आता थकवा घालवण्यासाठी आमचा अभिषेक सुरू झाला होता. गावठी कोंबडी तीचीच अंडी, माहोल छान रंगला होता.

सकाळी करकरीत इस्त्री करून घातलेला नेहरू शर्ट आणि पायजमा धावपळीत पार चुरगळला होता, मळला होता.

डोक्यावरची पांढरी गांधी टोपी माझ्याच खुर्ची खाली धुळ खात पडली होती आणि उरलेला एक झेंडा हाडकांच्या ढीगार्‍याखाली तुमच्या आणि माझ्या डोळ्यांत हरवलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचे क्षण कुठे दिसतात का? हे शोधत अखेरचा श्वास घेत होता.