Tag Archives: गुलाब

प्रश्न सामान्य -उत्तरे असामान्य

अकबर बादशहाने एकदा दरबारात प्रश्न केले –

पहिला प्रश्न – सर्वात श्रेष्ठ फ़ूल कुठल्या झाडाचे ?

इतर सर्व – गुलाबाचे

बिरबल – कपाशीचे. कारण त्या फ़ुलावरे जे फ़ळ धरते, त्या फ़ळातून कापूस मिळतो आणि त्या कापसापासूनच कापड व कपडे मिळून, आपले थंडी-उन्हापासून रक्षण होते; तसे लज्जारक्षण होते.

दुसरा प्रश्न – सर्वात श्रेष्ठ दात कुणाचा ?

इतर सर्व – हत्तीचा

बिरबल – नांगराचा. कारण त्याच्यामुळे शेतीची नांगरणी होऊन, धान्य पिकविता येते.

तिसरा प्रश्न – सर्वात श्रेष्ठ पुत्र कुणाचा ?

इतर सर्व – राजाचा.

बिरबल – गाईचा. कारण तो शेत नांगरतो व शेणाद्वारे खत व जळन देतो. एवढेच नव्हे, तर मेल्यानंतरही पादत्राणांसाठी चामडे देऊन आपल्या पायांचे रक्षण करतो.

चौथा प्रश्न – सर्वात श्रेष्ठ राजा कोणता ?

इतर सर्व – सार्वभौम राजा.

बिरबल – मेघराजा. कारण त्याच्यामुळेच पाणी मिळते व शेती पिकते.

पाचवा प्रश्न – सर्वात श्रेष्ठ गुण कोणता ?

इतर सर्व – विद्याध्ययनाची इच्छा

बिरबल – धैर्य, कारण या गुणामुळेच माणसाला आपल्या इतर सर्व गुणांचा या जगात खरा उपयोग करता येतो.
बिरबलाने दिलेल्या या समर्पक उत्तरांनी, बादशहा भलताच खूश झाला.