Tag Archives: गोष्टॅए

मुलाचे पाय पाळण्यात दिसले.

‘चतुर न्यायाधीश तेनाली रमण’ म्हणून पुढं ख्याती पावलेला तेनाली या गावचा रमण हा दहा-बारा वर्षाचा असताना घडलेली गोष्ट. एके दिवशी हंपी नगरीतील एका रस्त्यानं तो जात असताना एका छोट्या घराच्या पुढल्या उंबरठयात बसून रडत असलेली एक म्हातारी त्याने पाहिली. त्यानं थांबून तिला विचारलं, ‘आजीबाई ! का बरं रडता ?’

ती म्हातारी म्हणाली, ‘बाबा, काय सांगू तुला ? पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळच्या वेळी चार प्रवासी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘आजी ! आमच्यपाशी हा सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला डबा आहे. आम्ही प्रवासी असून, आम्हांला आजच्य आज पुढल्या गावी जायचं आहे, परंतू त्या गावी पोहोचायला बरीच रात्र होईल. आम्ही जर या दागिन्यांसह त्या गावी गेलो, तर वाटेत एखादा चोर वा दरोडे खोर आमच्या जवळचे हे दागिने लुबाडण्याची शक्यता आहे. म्हणून हा दागिन्यांचा डबा तुझ्याजवळ सांभाळून ठेव. जेव्हा चौघेही एकाच वेळी तुझ्याकडे हा डबा मागू, तेव्हाच हा डबा तू आमच्या स्वाधीन कर.’ याप्रमाणे बोलून व तो डबा माझ्या स्वाधीन करुन ते चौघेही मुसाफ़ीर इथून निघून गेले.’

म्हातारी पुढं सांगू लागली, ‘त्यानंतर परवा सकाळी ते चौघेही प्रवासी बरोबर आले व माझ्या घरासमोर असलेल्या त्या पिंपळाच्या पारावर बसले. मग त्यांच्यापैकी एकजण माझ्याकडे पाणी पिण्यासाठी आला. पाणी पिऊन होताच, त्याने माझ्याकडे तो दागिन्यांचा डबा मागितला. पिंपळाच्या पारावर बसलेल्या बाकीच्या तिघांना ‘मी दागिन्यांचा डबा याच्याजवळ देऊ का? असं मोठयनं विचारणं योग्य नसल्याने मी त्यांना नुसतं मोघम ‘याच्याजवळ देऊ का ?’ असं विचारलं. पण ‘मी याच्यबरोबर पाणी पाठवू का?’ असं त्यांना विचारते आहे, असा गैरसमज होऊन ते ‘हो’ म्हणाले. पिंपळाच्या पारावरचे ते तिघे ‘हो’ म्हणत आहेत असा माझा गैरसमज होऊन मी तो डबा माझ्याकडे आलेल्या माणसाच्या हाती दिला. तो डबा हाती येताच तो इसम माझ्या घराच्या मागल्या दरवाजातून बाहेर पडून विजेच्या गतीनं नाहीसा झाला.’

डोळ्यांत जमा झालेले अश्रु आपल्या लुगड्याच्या पदरानं पुसत ती म्हातारी पुढं म्हणाली, ‘तो चौथा इसम याप्रमाणे नाहीसा होताच, उरलेले तिघे माझ्याकडे आले आणि तो डबा मागू लागले. मी सत्य परिस्थिती त्यांना सांगितली, पण ते ऎकेनात. अखेर त्यांनी राजाकडे धाव घेतली. राजाने त्या तिघांना न्यायधीशांकडे पाठविले. न्यायाधीशांनी त्या तिघा प्रवाशांची तक्रार खरी असल्याचे सांगून, मी त्यांच्या दागिन्यांची किंमत पंधरा दिवसांच्या आत त्यांना द्यावी, अन्यथा दहा वर्षांच्या कारावासाला तयार व्हावे, असा निर्णय दिला. आता बाळ तूच सांग, की यात माझी काय चूक होती का ? आणि अशा स्थितीत मी गरीब म्हातारी त्यांना दागिन्यांचे पैसे देऊ शकत नसल्याने, विनाकारण माझ्या नशिबी कारावास येणार आहे !’
ती म्हातारी त्या बाल रमणशी याप्रमाणे बोलत असता, योगायोगनं राजा कृष्णदेवराय हा वेष बदलून त्या वेळी त्याच रस्त्यानं चालला होता. त्याच्या कानी म्हातारीचे शब्द पडले. आता हा मुलगा तिला काय उत्तर देतो, हे ऎकण्याची त्याला उत्कंठा लागली व म्हणून त्याने आपल्या चालण्याचा वेग एकदम मंद केला.

त्या म्हातारीची कैफ़ीयत ऎकून बाल रमण म्हणाला, ‘न्यायदान साफ़ चुकीचं झालेलं आहे. मी न्यायाधीश असतो, तर अगदी वेगळा निर्णय दिला असता.’

ते ऎकून आश्चर्यचकित झालेला राजा आपल्या वाड्यावर गेला आणि त्याने आपल्या सेवकाकरवी ती म्हातारी, तो मुलगा, ते दावेदार तीन प्रवासी आणि न्यायमुर्ती यांना दरबारात बोलावून घेतलं.

संबधित सर्वजण दरबारात येताच राजा त्या मुलाला म्हणाला, ‘ बाळ! न्यायमुर्तींनी या बाईला दिलेली शिक्षा तुला चुकीची वाटते ना? तर मग तू निर्णय दे पाहू?’

रमणच्या इच्छेनुसार राजानं त्याला बसण्यासाठी उच्च आसन दिलं. त्यावर बसून त्यानं ते तीन प्रवासी व ती वृध्द बाई यांचं म्हणणं ऎकून घेतलं आणि नंतर त्यानं त्या तीन प्रवाशांना विचारलं, ‘एकूण, काय, तर ‘आम्ही चौघेही जेव्हा एकाच वेळी हा दागिन्यांचा डबा मागायला तुझ्याकडे येऊ, तेव्हाच तू हा डबा आमच्या स्वाधीन करं, ‘असं तुम्ही या आजीबाईला म्हणाला होता; होय ना?’

‘होय ! अगदी असचं आम्ही या म्हातारीला म्हणालो होतो, ‘असं त्या तिघाही प्रवाशांनी एका सुरात उत्तर दिलं.

ते ऎकून रमण लगेच म्हणाला, ‘तर मग सध्या तुम्ही तिघेच असल्यामुळे, तुम्हाला या आजीबाईकडे तो डबा मागण्याचा अधिकार नाही, आणि तो डबा तुम्हाला देण्याचा तिलाही अधिकार नाही. ज्याने तो डबा चोरुन नेला आहे, त्याल घेऊन ह्या आजीबाईकडे या म्हणजे पुढं काय करायचं ते पाहता येईल. तोवर आजीबाई निर्दोष आहे.’

छोट्या रमणने दिलेल्या या निर्णयामुळं राजा व न्यायाधीश यांच्यासह सर्वच जण थक्क झाले.