Tag Archives: घंटा

द्वाड कुत्रा

एक मनुष्याचा एक कुत्रा होता, तो ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जात असे म्हणून त्याच्या धन्याने त्याच्या गळ्यात एक घंटा बांधली होती. ते एक मोठे भूषणच आहे असे समजून तो मूर्ख कुत्रा शेजारच्या कुत्र्यांचा तिरस्कार करू लागला, आणि त्यांस आपल्याजवळ उभा करीनासा झाला.

तेव्हां त्यापैकी एक म्हातारा कुत्रा त्यास म्हणाला, ‘बाबा, तुझ्या गळ्यात ही वस्तू बांधली आहे, इतक्याचसाठी तू स्वतःस मोठा समजत असलास तर खुशाल समज; पण ज्याने ही घंटा तुझ्या गळ्यात बांधली आहे, त्याने ती भूषण म्हणून बांधलेली नसून अप्रतिष्ठेची खूण म्हणून बांधिली आहे !’

तात्पर्य : एखादया वाईट गुणामुळे किंवा दृष्ट कृत्यामुळे एखादया मूर्ख मनुष्याचे नाव प्रसिद्ध झाले असता, त्याचे मोठे भूषण वाटते. कोणत्याही प्रकारे, लोकांत आपली प्रसिद्धी व्हावी इतकीच त्याची इच्छा असते, मग ती प्रसिद्धी वाईट कर्मामुळे होवो वा चांगल्या कृत्यामुळे होवो, त्याची पर्वा त्याला वाटत नाही.