Tag Archives: घड्याळ

चोर असा सापडला

एका गृहस्थाकडे पाच नोकर होते. त्यांच्यापैकी एकानं एकदा आपल्या मालकाचं मनगटी घड्याळ चोरलं. मालकानं त्या पाचही नोकरांना दटावलं, पण प्रत्येकजण ते आपण चोरलं नसल्याचं शपथेवर सांगू लागला.

अखेर त्या मालकानं सारख्याच लांबीच्या पाच काठ्या आणून व भटजींनी बोलावून त्यांची पूजा केली. मालकाच्या शिकवणीनुसार भटजींनी कसलासा मंत्र म्हणत, त्या काठ्यांवर अक्षता टाकल्या व नोकरांना ऎकू जाईल अशा आवाजात ते मालकाला म्हणाले, ‘यातली एकेके काठी एकेका नोकरांजवळ द्या. ज्या नोकरानं तुमचं घड्याळ चोरलं असेल, त्याच्या जवळची काठी रात्रीत एक बोटभर वाढेल.’
ते नोकर झोपते वेळी, मालकाने प्रत्येकाजवळ एकेक काठी दिली व नंतर तो स्वत: झोपायला गेला.
ज्याने घड्याळ चोरले होते, त्याने विचार केला, ‘आपण चोरी केली आहे, तेव्हा आपल्याजवळची काठी रात्रीत आपल्या एका बोटाइतकी वाढेल. म्हणून आपण ही काठी अगोदरच बोटभर तोडून ठेवावी, म्हणजे पहाटेपर्यंत बोटभर वाढल्यावर ती इतर नोकरांजवळ असलेल्या काठ्यांच्या लांबीचीच होईल.’ असा विचार करुन त्याने आपल्या जवळच्या काठीचा एक बोटभर लांबीचा तुकडा तोडून, तो दूरवर फ़ेकून दिला आणि तो झोपी गेला.

पहाटे पहाटे मालक त्या नोकरांच्या झोपण्याच्या खोलीत गेला व त्याने प्रत्येकाकडे आदल्या रात्री दिलेल्या काठीची मागणी केली. चौघांजवळच्या कठ्या मूळच्या स्थितीत होत्या. फ़क्त एकाजवळची काठीच काय ती बोटभर छाटली गेली होती.

आपण योजलेली युक्ती बरोबर फ़ळाला आली हे पाहून मालकाने त्या नोकराला खरपूस दम दिला; तेव्हा त्याने चोरी केल्याचे कबूल केले व ते घड्याळही आणून दिले.